वसई : अर्नाळा एसटीचे डेपो मॅनेजर शिरसाट यांनी खाडे नावाच्या चालकाला दंडुक्याने शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास बेदम मारहाण केली. याप्रकरणी त्याने अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.जेवत असतांना आलेल्या खाडे या चालकाला मॅनेजर शिरसाट यानी मला आता जेऊ दे, तू येथून जा, असे सांगितले होते. त्यानंतर गावीत यांनी डेपो मॅनेजर महादेव शिरसाट यांना काही तरी जाऊन सांगितल्याने शिरसाट माझ्याकडे आले. एका वॉचमनच्या हातातील दंडुका घेऊ़न काही विचारपूस न करताच त्यांनी मला बेदम मारहाण केली, अशी तक्रार चालक राजू खाडे यांनी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात केली आहे.डेपो मॅनेजर शिरसाट यांनी गेल्या महिन्यात रजा मागण्यासाठी गेलेल्या एका चालकाला असेच मारले होते. तर माझ्यासह तीन चालकांना एक-एक दिवसांसाठी निलंबित केले होते. शिरसाट यांच्या जाचाला कामगार कंटाळले आहेत. पण, कारवाईच्या भीतीने कुणीही बोलायला तयार नाही. माझी चूक नसताना अमानुषपणे मारहाण केल्याने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे खाडे यांनी सांगितले. खाडे यांच्यावर अंगावर दंडुक्याने मारहाण केल्याचे वण दिसत आहेत.याप्रकरणी माहिती घेण्यासाठी डेपो मॅनेजर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मात्र संपर्क होऊ शकला नाही.इंटकद्वारे दखल गायकवाडांचा इन्कारइंटकने सदर प्रकरण गंभीरपणे घेतले आहे. चालक दोषी असला तर त्याच्याव कायदेशीर कारवाई करणे योग्य ठरले असते. त्याऐवजी दंडुक्यांने अमानुष मारहाण करणे अयोग्य आहे. खाडे यांच्यावर कारवाई करण्याऐवजी मारहाण करणाºया डेपो मॅनेजरवर कारवाई झाली पाहिजे. कामगारांवर अन्याय झाल्यास तो सहन केला जाणार नाही, असे इंटकचे पालघर जिल्हाध्यक्ष निलेश पेंढारी यांनी सांगितले.पालघर विभागीय नियंत्रक गायकवाड यांनी खाडे यांना मारहाण केल्याचा आरोप फेटाळून लावला. खाडे दारू प्याले होते. त्यांचा इतर चालकांशी वाद झाला आणि आपापसात हाणामारी झाली. डेपो मॅनेजर शिरसाट यांनी कुणालाही मारहाण केलेली नाही. याप्रकरणी खाडेसह हाणामारी केलेल्या चालकांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, असेही गायकवाड यांनी सांगितले.
एसटीचालकाला मारहाण, कु-हाडीचा दांडा गोतास काळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 4:36 AM