सुरेश काटेतलासरी : आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत तलासरीमध्ये सुरू असलेले कल्चरल हॉलचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून या बांधकामात दगडी भुशाचा वापर केला जात आहे. आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या व ठेकेदाराच्या हातमिळवणीमुळे प्रकल्पाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून याकडे आदिवासींचे पुढारी म्हणवणाऱ्यांचेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.
बांधकामात दगडी भुसा वापरला जात असतानासुद्धा या बांधकामाकडे आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे की, आर्थिक लाभामुळे या निकृष्ट कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. आदिवासी विकास प्रकल्प डहाणूअंतर्गत तलासरी तहसील कार्यालयाजवळ एक कोटी रुपये खर्च करून कल्चरल हॉल बांधण्यात येत आहे. मात्र या कल्चरल हॉलच्या बांधकामासाठी रेतीऐवजी दगडी भुशाचा वापर करण्यात येत असल्याने हे बांधकाम किती काळ तग धरेल याबाबत शंका निर्माण होत आहे.
आदिवासी प्रकल्पांतर्गत निकृष्ट बांधकामे करायची व नंतर वर्षानुवर्षे दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च करायचे आणि ठेकेदार व अधिकारी मिळून मलई खात राहायची हा प्रकल्पाचा शिरस्ता आहे, असा आरोप होत आहे. अशा बांधकामांबाबत झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी कारवाईसाठी तलासरीत उपोषणेही झाली आहेत, पण कारवाई झालेली नाही.
माहिती घेऊन कारवाईतलासरीमधील कल्चरल हॉलच्या बांधकामात दगडी भुशाचा वापर होत असल्याबाबत आदिवासी विकास प्रकल्प बांधकामाचे अभियंता अक्षय देसाई यांच्याकडे विचारणा केली असता, बांधकामात दगडी भुसा वापरला जात असेल तर तो बंद करायला लावतो, असे त्यांनी सांगितले. तर आदिवासी विकास प्रकल्प बांधकामचे उपअभियंता अहेर यांनी याबाबत माहिती घेतो, असे सांगितले.