लोकमत न्यूज नेटवर्क वसई : गेली १९ वर्षे रखडलेल्या कामण-बापाणे रस्त्याचे काम सुुरु करावे या मागणी या परिसरातील गावकरी कामण-बापाणे रस्ता कृती समितीच्यावतीने बुधवारी रास्ता रोको करणार आहेत. कामण परिसरातील गावांसाठी या रस्त्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यासाठी सिडकोच्या विकास आराखड्यात डीपी रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर १९९८ साली शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून महत्वपूर्ण रस्त्याची जागा निधीसह सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही मात्र त्याने त्याचे काम सुरु करण्यास दोन-तीन वर्षांचा कालावधी लावला होता. त्यावेळी गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर जागा आलेल्या या विभागाने रस्त्याच्या परिसरातील अतिक्रमणे दूर केली. पण, रस्त्याची जागा संपादित करताना अधिकाऱ्यांनी अनेक चुका केल्याने तिच्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झालीत. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचा फार्स काही वर्षे करण्यात आला. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. उलट अतिक्रमणे वाढत गेली आणि रस्त्याचे काम १९ वर्षे झाली तरी सुरु होऊ शकलेले नाही. महापालिकेच्या विकास आराखड्यात रस्ता प्रस्तावित असून आता महापालिकेने रस्त्याचे काम करावे अशी मागणी या कृती समितीने केली आहे. ही मागणी गेल्या चार महिन्यांपासून करण्यात येत असली तरी तिच्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने शेवटी समितीला आता आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला.
बापाणे रस्त्यासाठी आज रास्ता रोको
By admin | Published: June 28, 2017 3:07 AM