पारोळ : अर्नाळा डेपोमधून दुपारनंतर ठाण्याला जाणाऱ्या एम.एच. २० बी.टी. २०३९ अर्नाळा ठाणे या एसटी फेरीचा चालक नशापान करून बस चालवत असल्याचे लक्षात येताच संतप्त प्रवाशांनी विरारफाटा येथे एसटी रोखून धरली. चालक नशापान करून बस चालवत असल्याचे अर्नाळा डेपो मॅनेजर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर दुसरी बस डेपोतून पाठवण्यात आली . मात्र तोपर्यंत सदर बस प्रवाश्यांनी रोखून धरली होती .
अर्नाळ्याहून ठाण्याला जाणाºया प्रवाश्यांनी प्रवास सुरु असताना विरार फाटा दरम्यान बस मार्गस्थ होताना हेलकावे खात होती, मधूनच बसचा वेडेवाकडेपणा समजताच ही बाब वाहकाच्या निदर्शनास आणून प्रवाश्यांनी बस थांबवली. याबाबत चालकाला विचारणा करताना चालक नशेत असल्याचे त्याच्या एकंदरीत वागणुकीवरून दिसून आले. यामुळे संतप्त प्रवाश्यांनी पुढील प्रवासात होणारा संभाव्य धोका ओळखून सदर बसचा पुढील प्रवास हा वेगवान महामार्गावरून न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, प्रवाश्यांनी अर्नाळा आगार व्यवस्थापक यांच्याशी फोन वरून संपर्क करून सदर बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांनी प्रवाश्यांना पुढील प्रवासासाठी एम.एच. २० बी.एल. १५०७ या दुसºया बसची व्यवस्था तातडीने करून दिल्यानंतर पुढील प्रवास सुरु झाला . मात्र, नशापान करून प्रवाश्यांचा जीव धोक्यात घालणाºया दत्तात्रेय रामदास किन्हाके या चालकावर त्वरित कारवाई करण्याची मागणी यावेळी प्रवाश्यांनी केली.
त्या बसच्या नशेबाज चालकावर विरार पोलीस ठाण्यात १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून एसटी महामंडळाच्या खात्या अंतर्गत वरिष्ठ कार्यालयात अहवाल पाठविण्यात आला आहे. तसेच, लागलीच चालकाला लाईन आॅफ करण्यात आले आहे .- संदीप बेलदार,डेपो मॅनेजर,अर्नाळा बस आगार