वसंत भोईर
वाडा : वाडा तालुक्याला पाच नद्यांचे वरदान लाभले असून या पाच नद्यांवर जिल्हा परिषदेने पाणी अडविण्यासाठी कोकण बंधारे बांधले आहेत. या त्यातून वाहून जाणारे पाणी दरवाजे बंद करून आडवावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.वाडा तालुक्यामध्ये गेल्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागाने काही कोटी खर्च करून तानसा नदीवर उचाट, नारे, मेट, डाकिवली या ठिकाणी, वैतरणा नदीवर कळंभे, सोनाळे, तिळसे, वाडा, गांध्रे, गातेस, कोनसई, आंबिस्ते, बोरांडा या ठिकाणी तर पिंजाळ नदीवर पीक, मलवाडा, पाली, आलमान, गुहीर, सांगे आदी ठिकाणी बंधारे बांधले आहेत. आॅक्टोबरमध्ये या बंधाºयाचे दरवाजे बंद केले जातात. परंतु यंदा नोव्हेंबरचा दुसरा आठवडा सुरु झाला तरी ते बंद करण्यात आलेले नाही. त्यामुळे पाणी वाया जाते आहे. त्यामुळे ते बंद केल्यास पाणी साठून त्याचा फायदा शेतकºयांना होणार आहे.याच बंधाºयाच्या पाण्यावर अनेक शेतकरी भाजीपाला, फुल व फळशेती करीत असतात. हे दरवाजे वेळीच बंद केल्यास साठणाºया पाण्याचा फायदा शेतकºयांना मार्च-एप्रिलपर्यत होत असतो. मात्र दरवाजे लावण्यास उशीर केल्यास बंधाºयातील पाणी वाया जाऊन त्याचा फटका शेतकºयांना बसतो. गेल्या वर्षी बंधाºयाचे पाणी अडविण्यासाठी काही ठिकाणी फायबर दरवाज्यांचा वापर केला होता. मात्र त्यांचा दर्जा अत्यंत सुमार असल्याने ते पाण्याच्या दाबाने तुटून गेले होते. तर काही ठिकाणी दरवाजे बसवण्यासाठी कुठल्याही प्रकारचे पॅकिंग न करता मातीचा वापर केल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होऊन डिसेंबरच्या अखेरीस काही बंधारे कोरडे पडले होते. तसे यंदा होऊ नये अशी शेतकºयांची मागणी आहे.