वसई : वसईतील चुळणे गावानजीक शहर वसाहतीच्या भागात प्रचंड प्रमाणात मातीभराव सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. मातीभराव थांबवा, अन्यथा पुढील आठवड्यात माणिकपूर नाका किंवा भाबोला नाका येथील रस्ता बंद पाडण्याचा इशारा वसईकरांनी दिला आहे.दोनच दिवसांपूर्वी चुळणे ग्रामस्थांच्या एका शिष्टमंडळाने या बेसुमार मातीभराव व सपाटीकरणाबाबत महसूल विभागाकडे तक्रार करीत प्रांत व तहसीलदार यांना निवेदन सादर केले होते. शिष्टमंडळाने चुळणे शहरी भागात सुरू असलेला मातीभराव तत्काळ थांबवण्याच्या दृष्टिकोनातून वसईचे प्रांत व तहसीलदार यांची भेट घेतली होती. गावकऱ्यांनी गोम्स यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाची भेट घेऊन चार दिवस उलटले, तरी अद्याप काहीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेले जागृती संघटनेचे मार्गदर्शक तथा तत्कालीन चुळणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जॅक गोम्स यांनी ग्रामस्थांच्या बैठकीत येत्या दोन दिवसात रास्ता रोको आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती ‘लोकमत’ला दिली आहे.गोम्स यांच्या सांगितले की, कधी काळी अतिशय निसर्गरम्य व हिरवाईने नटलेला चुळणे गाव अशी ओळख असलेल्या गावाला आता सिमेंटच्या जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गावाच्या चारही बाजूनी मोठमोठे बांधकाम प्रकल्प उभे राहिल्याने प्रत्येक वर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गावात पाणी तुंबून राहते. तांत्रिक दोष असा की, मोठमोठ्या इमारती बांधताना विकासकांनी येथील पावसाळी पाणी वाहून नेणारे नैसर्गिक नाले बुजवल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.गेल्या पावसाळ्यात सलग चार दिवस चुळणे गाव पाण्याखाली होते. गावाचा बाह्य जगाशी संबंध तुटल्यासारखी स्थिती होती तर अनेक ठिकाणी वीज मीटरच्या बॉक्समध्ये पाणी शिरल्याने संभाव्य अपघात टाळण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. घराघरात पाणी तुंबल्याने ग्रामस्थांचे लाखो रु पयांचे नुकसान झाले. सध्या याच गावाच्या परिसरात सुरू असलेल्या माती भरावामुळे येत्या पावसाळ्यात भीषण स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत.आज चुळणेकर जात्यात आहेत, तर उत्तर वसईचा बराच भाग सुपात आहे. सर्व ग्रामस्थांनी मिळून विकासकांना रोखले नाही तर आज जे चित्र दिसते ती स्थिती संपूर्ण उत्तर वसईची दिसू शकेल.जॅक गोम्स, माजी सरपंच, चुळणे, वसई
वसईकर करणार रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 10:38 PM