वसई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विरार पूर्व भागातील सकवार गावांत ऐन कोरोनाचे वाढते संक्रमण असताना देखील हळदीच्या कार्यक्रमासाठी शनिवारी संध्याकाळी शेकडोंच्या संख्येने जमलेल्या गावकऱ्यांमध्ये आपसांत तुफान मारामारी झाल्याची घटना रविवारी समोर आली आहे. या हळदीच्या कार्यक्रमात दोन ते तीन गटात कशी मारामारी झाली याचा संपूर्ण व्हिडीओच आता समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विरार पूर्व सकवार गावांत तांबडी कुटुंबातील सुनील नामक व्यक्तीचे लग्न रविवार दि 16 मे रोजी असल्याने त्याच्या हळदीसाठी पाच -पंचवीस नाही तर दोनशे हुन अधिक गावकऱ्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. याठिकाणी सर्वत्र कोविड नियमाचे कुठे ही अक्षरशः पालन झालेलं नाही याउलट जमलेल्या शेकडोंमध्ये काही शुल्लक कारणावरुन काही तासांनी मोठा बवाद झाला आणि त्यात दोन ते तीन गटात मारामारी देखील झाली. प्रसंगी एकमेकांच्या अंगावर खुर्च्या ही उचलल्या गेल्या तर काही जण फुल टू ही होते.
दरम्यान, शासनाच्या कोविड नियमानुसार लग्न समारंभा साठी केवळ 25 जणांची उपस्थिती व लग्न सोहळा दोन तासांत आटोपणे बंधनकारक असताना इथे गावांत शेकडो ग्रामस्थ जमेलच कसे असा प्रश्न देखील आता पोलीस व जिल्हा प्रशासनाला पडला आहे. तर बाजूलाच राहणाऱ्या सरपंच व गावच्या पोलीस पाटलाला ही कोरोनाला निमंत्रण देणारी गर्दी व हा तमाशा का बरं दिसला नाही. किंबहुना घडल्या प्रकारा बाबत विरार पोलीस व जिल्हाधिकारी या कोरोना प्रादुर्भाव वाढवण्यासाठी सहकार्य करणाऱ्या गावकऱ्यांवर काही कारवाई करणार का असा ही प्रश्न नियम पाळणारे सुज्ञ लोकं आता हा व्हिडीओ पाहून विचारत आहेत.