- शशी करपेवसई : वरिष्ठांच्या मानसिक त्रासाला कंटाळून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गोसावी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर पालघर जिल्ह्यात पोलिसी अत्याचाराची चर्चा सुरु झाली आहे. गेल्या दोन महिन्यात पोलीस अत्याचाराला कंटाळून आत्महत्येचे तीन प्रकार घडले असून एका घटनेत तरुणाचा जीव गेला आहे.पालघर जिल्हा मु्ख्यालयात नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गोसावी यांनी गुरुवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलीस अधिक्षकांसह काही वरिष्ठ अधिकारी मानसिक त्रास देत असल्याचा गोसावी यांचा आरोप आहे. त्याच दिवशी वाडा तालुक्यातील चिंचघर येथील कृपाल पाटील (२८) या तरुणाने सहाय्यक पोलीस निरीक्षक रणवारे यांच्या अत्याचाराला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. तर १० नोव्हेंबर २०१७ रोजी विरार येथील विकास झा (२३) या तरुणाने पोलिसांच्या अत्याचाराला कंटाळून वसई डीवायएसपी कार्यालयासमोर स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात विकासचा मृत्यू झाला होता.तक्रारदाराची पोलीस ठाण्यात अडवणूक होत असल्याच्या तक्रारी नव्या नाहीत. मात्र पालघर जिल्हयात दोन महिन्यात तीन जणांनी पोलिसांच्या अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. त्यातील एका घटनेत तर खुद्द पोलीस कर्मचाºयानेच स्वत:चे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला आहे. या घटना घडल्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवायाही तितक्याच धक्कादायक आहेत.कारवाई न करता पक्षपाती भूमिकाविकास झाने तर आत्महत्येपूर्वी सोशल मिडीयावर व्हीडीओ अपलोड करून पोलिसांचा जाच चव्हाट्यावर आणला होता. मात्र, पोलिसांनी विकास झाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे सांगत प्रकरणावर पडदा टाकण्याचे काम केले होते. त्यामुळे विरार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना अभय मिळाले आहे.महेश गोसावी यांनीही वरिष्ठांच्या नावाने जबाब लिहून दिला आहे. मात्र, गोसावींची पार्श्वभूमी वादग्रस्त असून याआधीही त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दबाव टाकण्यासाठी विविध प्रकार दबाव टाकण्याचे तंत्र गोसावी अवलंबवित असतात असे सांगत पोलिसांनी याप्रकरणात कोणतीच कारवाई केली नाही.वरील दोन्ही प्रकरणात वरिष्ठांवर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र, गुरुवारी वाडा येथील कृपाल पाटील प्रकरणात मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक रणवारे यांना तडकाफडकी निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली. या तीनही प्रकरणात पोलिसांनी प्रथमदर्शनी कोणताही गुन्हा दाखल न केल्याने पक्षपाती होत असल्याचे बोलले जात आहे.
पोलीस दलात तणाव वाढला; दोन महिन्यांत आत्महत्येचा तिसरा प्रयत्न, पोलीस अत्याचारांमुळे आत्महत्येचे प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 4:43 AM