रवींद्र साळवेमोखाडा : डिजिटल भारताचे स्वप्न आपण सगळेच पाहत आहोत. देशाचा विकास होत असल्याचा दावा केंद्र सरकार करतेय, तर राज्य सरकार महाराष्ट्र प्रगती करतोय, असा दावा करतेय. पण पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांचा रस्ता मात्र या ‘विकास’ महाशयांना सापडतच नाहीये. कारण गेल्या अनेक वर्षांपासून या पाड्यांना पाणी, रस्ते, वीज, आरोग्य सुविधा यांची प्रतीक्षा आहे. दरम्यान, पालघरमधील सावरखूट पाड्यावरील आदिवासींना घोटभर पाण्यासाठी दोन किमीचा डोंगर करावा लागत आहे.
अर्थसंकल्पात आदिवासींच्या विकासासाठी मोठी तरतूद केली जाते, पण विकास दिसत नाही. मुंबई पासून १०० किमी अंतरावर तर शहापूरपासून ३५ ते ४० अंतरावर अजनूप दापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत १७ घरे व १०० लोकवस्तीचा ठाणे व पालघरच्या सीमेवर मोखाडा तालुक्यालगत डोंगरात वसलेला सावरखूटपाडा हा सोयीसुविधांअभावी मरणयातना भोगत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरणालगत सावरखुटपाडा वसलेला आहे. धो-धो पाणी वाहून जात असताना या आदिवासींना पाणी मिळत नाही. रणरणत्या उन्हात अनवाणी दोन किमीचा डोंगर तुडवत वृद्ध महिला, मुलांना पाणी आणावे लागत आहे, परंतु याकडे प्रशासन, लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
पाणीटंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या तिपटीने वाढणार?n राज्यात उन्हाचा चटका वाढला असल्याने टँकरने पाणीपुरवठ्याची मागणीदेखील वाढली आहे. n पाणीटंचाईवर उपाय म्हणून पाणीपुरवठा विभागाकडून दरवर्षी लाखो रुपये खर्च करून टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जातो. n यंदाही शहापूर तालुक्यात २६ पाण्याच्या टँकरद्वारे १२६ गावपाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. n येत्या काही दिवसात पाणीटंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या तिपटीने वाढ होणार आहे.
आमचं पाणी लय लांब, पाणी आणायला दोन तास लागतात, डोंगरातून पाणी घरी घेऊन जाताना अक्षरशः आत्महत्या करावीशी वाटते.- यशोदा वारे, वृद्ध महिला, सावरखूटपाडा
ठक्करबाप्पा योजनेच्या माध्यमातून तसेच जलजीवन मिशनच्या माध्यमातून सावरखूटपाड्याचा पाण्याचा प्रश्न व रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत, परंतु चारही बाजूने वनविभागाची जमीन असल्याने अडचणी येत आहेत. तरीदेखील आम्ही या पाड्याची समस्या सोडवण्याकाठी प्रयत्नशील आहोत. - दौलत दरोडा, आमदार