- शशी करपे, वसईवसईच्या अत्यंत जिव्हाळ््याच्या प्रश्नावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने महापालिकेला जागा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या १ एप्रिलपासून एसटीची सेवा बंद होऊन महापालिकेची परिवहन सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. एसटीने येत्या १ एप्रिलपासून नालासोपारा आणि वसई आगारातून सुटणाऱ्या ग्रामीण भागाला जोडणाऱ्या शहरी बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या धोरणानुसार त्यामार्गावर महापालिकेच्या परिवहन विभागाने बस सेवा सुरु करणे बंधनकारक आहे. मात्र, बस उभ्या करणे, प्रवाशी निवारा शेड बांधणे, बस स्टँड यासाठी जागा नसल्याने महापालिकेने एसटीकडून भाडेतत्वावर जागेची मागणी केली आहे. गेल्या दीड वर्षांपासून मागणी करूनही एसटीच्या अधिकाऱ्यांनी ती पूर्ण करण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे महापालिकेने जोपर्यंत भाडेतत्वावर जागा मिळत नाही तोपर्यंत एसटीच्या नालासोपारा आणि वसई आगारातून बंद होणाऱ्या २१ शहरी मार्गावर बस सेवा सुरु करण्यास नकार दिला आहे. मंगळवारी विरार येथे आलेल्या परिवहन मंत्र्यांनीही याबाबत ठोस निर्णय न घेता एसटीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करा असा सल्ला महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला होता.शनिवारी महापालिका आयुक्त सतीश लोखंडे, उपायुक्त किशोर गवस आणि परिवहन सभापती भरत गुप्ता यांनी एसटीचे व्यवस्थापकीय संचालक गोयल, महाव्यवस्थापक आर. आर. पाटील यांना मुंबई सेंट्रल येथे भेटून जागेसंदर्भात चर्चा केली. यावेळी विरार एसटी स्टँड, नालासोपारा एसटी स्टँड, नवघर एसटी स्टँड आणि वसई एसटी स्टँडमधील जागा भाडे तत्वावर द्यावी असा आग्रह महापालिकेच्यावतीने धरण्यात आला. याठिकाणी किमान दहा बसेस उभ्या राहू शकतील इतकी जागा मिळावी अशी मागणी केली. त्यावर गोयल यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना सोमवारी जागेवर जाऊन पाहणी अहवाल देण्याचे निर्देश दिले.
जागेबाबत एसटीची भूमिका सकारात्मक
By admin | Published: March 19, 2017 5:32 AM