बोईसर : फीच्या कारणास्तव आॅनलाईन क्लासेसमधून वगळलेल्या विद्यार्थ्यांचा पुन्हा समावेश करून घ्या, या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी चिन्मया विद्यालयासमोर पालक एकत्र आले होते. या वेळी पालकांची मोठी गर्दी झाली होती. या पालकांनी एकत्र येत शाळेला पत्र दिले, परंतु शाळा व व्यवस्थापन समितीने कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्याने पालक वर्गाने एक समिती स्थापन करून पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र दिले आहे.लॉकडाऊनमध्ये चिन्मया विद्यालयात आॅनलाईन क्लासेस चालू होते, परंतु फी न भरल्यामुळे काही विद्यार्थ्या$ंना आॅनलाइन क्लासमधून वगळले होते. याबाबत जाब विचारण्यासाठी पालक एकत्र आले. या वेळी संताप व्यक्त करण्यात येऊन शाळेने आपल्या सिस्टीममध्ये सर्व विद्यार्थ्यांचा समावेश करून घ्यावा, तसेच सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार द्यावा, अशी मागणी करण्यात आली.मार्चपासून लॉकडाऊन सुरू असून सर्वत्र शाळा-महाविद्यालये बंद आहेत. शासन निर्णयानुसार शाळा-महाविद्यालयांना नियमावली दिल्या आहेत. त्या आधारे पालकवर्ग आणि शाळा व्यवस्थापन यांच्यामध्ये चर्चा होणे गरजेचे आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये सक्तीने फी घेण्याबरोबरच ज्या शाळांनी आॅनलाईन क्लासेसमधून विद्यार्थ्यांना वगळले त्या शाळांवर कारवाई करावी, अशी मागणी केल्यानंतर आठवडाभरात चिन्मया विद्यालय व्यवस्थापन व पालक समिती याची संयुक्त बैठक घेऊन योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आले.
‘ऑनलाइन’मधून विद्यार्थ्यांना वगळले, बोईसरच्या चिन्मया विद्यालयासमोर पालकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 1:48 AM