- वसंत भोईरवाडा : तालुक्यात रविवारी झालेल्या महापुरात पाली आश्रम शाळेचे संपूर्ण साहित्य पुरात वाहून गेले. यामुळे शाळेचे संपूर्ण नुकसान झाले आहे. ही संपूर्ण शाळा स्वच्छ करण्यासाठी येथील विद्यार्थ्यांना दहा दिवस सुट्टी देण्यात आली असून यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वास्तविक, या आश्रम शाळेची इमारत आहे. मात्र येथे गुंज आश्रम शाळाचे विद्यार्थी स्थलांतरित केले असल्याकारणाने शाळेची इमारत असूनही या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते आहे.पाली आश्रमशाळा पिंजाळ नदीच्या काठावर आहे. यामुळे दरवर्षी या शाळेत पुराचे पाणी भरत असून शाळेचे नुकसान होते. त्यामुळे प्रशासनाने या शाळेसाठी भव्यदिव्य अशी इमारत बांधली आहे. मात्र, ही शाळा तेथे स्थलांतरीत करायला प्रशासनाला वेळ न मिळाल्याने तेथे गुंज आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना स्थलांतरित केले. तीन वर्षे उलटली तरी गुंज आश्रम शाळेच्या इमारतीच्या कामाला मुहूर्त सापडलेला नाही. शिवाय कुडूस परिसरात त्यांना भाड्याने देखील इमारत मिळत नाही. प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे या आदिवासी विद्यार्र्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.दरम्यान, खा. राजेंद्र गावित यांनी गुरुवारी या आश्रम शाळेची पाहणी करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, यासाठी समोरच बांधलेल्या इमारतीत शाळा सुरू करण्याचे आदेश देऊन गुंज शाळेची स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या.वर्ग खोल्यांची स्वच्छता करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू असून इ.१०वी, १२ वीचे वर्ग मंगळवार पासून सुरू होणार असून इतर वर्गांची शाळा देखील एक दोन दिवसात सुरू होईल. इमारतीमध्ये शाळा हलवण्याचे अधिकार वरिष्ठ पातळीवर होतात. याबाबत काही बोलता येणार नाही.- अनिल सोनावणे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प जव्हार
अजब कारभार! पाली आश्रमशाळेच्या इमारतीत गुंजचे विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 11:26 PM