वाडा : येथील दोन शैक्षणिक संकुलामधील ७ हजार विद्यार्थ्यांनी कुडूस ते चिंचघर हा खराब रस्ता व त्यावर सतत उडणारी धूळ याला कंटाळून निवेदनाद्वारे २६ मार्च रोजी कुडूस नाक्यावर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. परंतु, ठेकेदाराकडून एका महिन्यात काम पूर्ण करण्याचे ठोस आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित केल्याची माहिती संबंधित संस्थाचालकांनी दिली.कुडूस - चिंचघर - गौरापूर या १२ किमी लांबीच्या रस्त्यापैकी कुडूस ते चिंचघर हा १३०० मीटरचा रस्ता सिमेंट क्र ाँकीटचा मंजूर झाला आहे आणि या १२ किमी लांबीच्या रस्त्यावरील हा टप्प्याच पादचारी व वाहनांच्या सततच्या वर्दळीने गजबजलेला असतो. या मार्गावरून रोज प्रवास करणारे ह.वि.पाटील विद्यालय व कै. घ.बा.पाटील कनिष्ठ महाविद्यालय आणि नॅशनल इंग्लिश स्कूलचे ७ हजार विद्यार्थी खराब रस्ता, धुळ यामुळे त्रस्त झालेले आहेत. या दोन्ही शैक्षणिक संस्थाचालकांनी ग्रामपंचायत कुडूस व चिंचघर यांच्याकडे तक्रार केली . या दोन्ही ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांकडे तक्रार केली. त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्याने अखेर कुडूस व चिंचघर ग्रामपंचायतीच्या सहकार्याने तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन २६ मार्च २०१८ रोजी कुडूस नाक्यावर विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यासह रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला. दरम्यान २४ मार्च रोजी पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांच्या दालनात त्यांनी तक्रारकर्ते व ठेकेदार यांची चर्चा घडवून आणली. यावेळी दोन्ही शाळांचे प्रतिनिधी श्रीकांत भोईर, मुस्तफा मेमन, रामदास जाधव, संतोष जोशी, दादासाहेब पोटकुले व ठेकेदार संदीप गणोरे , हर्षद गंधे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा कुडूस येथील रास्ता रोको स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 1:53 AM