जव्हार : जव्हार आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत चालविण्यात येणा-या आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थांना मिळणारा केळी, सफरचंद, मोसंबी या फळांचा पुरवठा आदिवासी विकास प्रकल्पाकडून अचानक बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आश्रम शाळेतील निवासी शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना मिळणारा सकस आहार मिळेनासा झाला आहे. मुळात आदिवसी कुटुंबातील हे विद्यार्थी असल्याने त्यांना चांगल्या आहाराची गरज वेळोवेळी व्यक्त होत असते.जव्हार आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत २९ शासकीय आश्रमशाळा व १७ विनाअनुदानित आश्रम शाळा आहेत. आदिवासी आश्रमशाळांना एकूण १७ हजार ५५६ विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेत आहेत. मात्र आश्रमशाळेत निवासी राहून शिक्षण घेणा-या विद्यार्थांना दररोज सकाळी दिला जाणारा आहार केळी, सफरचंद, मोसंबी, आणि अंडी हा सकस व पौष्टिक आहार आदिवासी विकास विभागाकडून अचानक बंद करण्यात आल्याने आदिवासी आश्रम शाळांमध्ये निवासी राहून शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या पोटावरच मारले आहे.>आश्रम शाळेची नियमावलीत बद्दल केल्याने, सकाळी मिळणारे जेवण आता दुपारी मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थांना फक्त सकाळी उसळीचा नास्ता मिळत असल्याने दुपारी २ वाजेपर्यंत उपाशी राहवे लागत आहे. विकास प्रकल्पअंतर्गत चालविण्यात येणा-या आश्रम शाळेतील निवासी मुलांना मिळणारा आहार नियमित मिळावा. अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून केली जात आहे. त्यातच आश्रमशाळेच्या वेळेत बद्दल करण्यात आल्याने विद्यार्थांना अनेक अडचणींना तोंड देण्याची वेळ आली आहे.
विद्यार्थ्यांना फळांचा पुरवठा झाला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 3:31 AM