जव्हार - तालुक्यातील कोरतड ते लहान मेढा रस्त्याचे काम चालू करण्यात आल्याने जव्हारहून देहेरे मार्गे डुंगाणी, मोर्चापाडा, आणि ओझरकडे यणाऱ्या एसटी बस अचानक बंद करण्यात आल्याने ऐन परिक्षेच्या हंगामात रोज ये-जा करणा-या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. यामुळे येथील विद्यार्थ्यांना १० कि.मी. अंतर पायी चालून दसकोड बस गाठावी लागत आहे.जव्हार एसटी डेपोच्या बस देहेरे मार्गे डुंगाणी, मोर्चापाडा आणि ओझर या बसेस लहान मेढा, मोठा मेढा, पेरणआंबा, भागडा, कुंडाचापाडा, या गावांहुन शेकडो कॉलेज व शाळकरी मुलं जव्हार ज्युनिअर कॉलेज आणि देहेरे आश्रम शाळेत ये-जा करीत आहेत. मात्र सावरपाडा ते लहान मेढा गावापर्यंत जिल्हा परिषदेने रस्त्याचे काम सुरु केले असून, रस्त्यावर खड्डी टाकून ठेवली आहे. तसेच, रस्त्याचे काम चालू करतांना पर्यायी रस्त्याची सोय करण्यात आलेली नाही. या भागातील लोकसंख्या पंधराशेच्या घरात असून दररोज २५० ते ३५० जणांना प्रवास करावा लागतो.पूर्ण रस्ता खोदल्याने तसेच खडीचे ढीग टाकल्याने दुचाकी चालवणेही धोक्याचेजिल्हा परिषद बांधकाम विभागाने येथील नागरिकांना कोणतीही पूर्व सूचना न देता रस्त्याचे काम चालू केले आहे. त्यात कुठलाही पर्यायी रस्ता ठेवण्यात आलेला नाही.ठेकेदाराने संपूर्ण रस्ता खोदून टाकला आहे. त्यामुळे कुठलेही या रस्त्याने खाजगी वाहन किंवा एसटीची बस जात नाही.त्यामुळे विद्यार्थी आणि प्रवाश्यांचे हाल झाले आहेत. रस्त्याचे काम युद्ध पातळीवर करावे किव्हा पर्यायी रस्ता द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
विद्यार्थ्यांची परीक्षाकाळात भर उन्हात होते १० किमी पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 6:01 AM