- हितेन नाईक पालघर : ७२० कि.मी.चा प्रदीर्घ किनारा लाभलेले मुंबई विद्यापीठ हे जगातले एकमेव विद्यापीठ असावे. त्यामुळे मत्स्य व्यवसायाशी निगडित नवनवीन अभ्यासक्रमासह अॅक्वाकल्चर सेंटर पालघरमध्ये सुरू करण्याचा मानस असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी पालघर मध्ये व्यक्त केला.मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र पालघर जिल्ह्यामध्ये जिल्हा मुख्यालया जवळ सोयीच्या ठिकाणी व्हावे यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुहास पेडणेकर सातत्याने प्रयत्नशील असून या प्रयत्नांचा एक भाग म्हणून गुरु वार (१३ जून ) रोजी उपकेंद्राची जागा निश्चित होण्याच्या दृष्टिकोनातून डॉ.पेडणेकर यांनी पालघर जिल्ह्याचा दुसऱ्यांदा दौरा केला. प्रथम त्यांनी जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांची भेट घेवून सुमारे १०० एकर जागेच्या उपलब्धतेबाबत आणि उपकेंद्राच्या उभारणी संबंधीच्या तांत्रिक बाबींची सविस्तर चर्चा केली. त्यानंतर सफाळे आणि माहीम येथील प्रत्यक्ष जागांवर जाऊन पाहणी केली.विद्यापीठाच्या उपकेंद्राची प्रशासकीय इमारत लवकरात लवकर सुरु करण्याची निकड लक्षात घेवून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी आवश्यक असलेली जागा ताब्यात देण्याची प्रक्रि या जलद गतीने पूर्ण केली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी कुलगुरुंसोबत विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ.सुनिल पाटील, माजी कुलसचिव डॉ.दिनेश कांबळे, सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे सचिव प्रा.अशोक ठाकूर, प्राचार्य डॉ.किरण सावे उपस्थित होते. विद्यापीठ उपकेंद्र मार्गी लागण्यासाठी समन्वयक म्हणून डॉ.दिनेश कांबळे आणि स्थानिय समन्वयक प्राचार्य डॉ.किरण सावे यांची नियुक्ती कुलगुरूंनी केली.जिल्हाधिकाºयांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मुंबई विद्यापीठाच्या सिंधू स्वाध्याय या उपक्र मांतर्गत सातपाटी येथे मत्सव्यवसायाशी संबंधित अत्याधुनिक अभ्यासक्र म सुरु करण्यासाठी संबंधित शिष्टमंडळाने सातपाटी येथील सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाशी चर्चा केली. यावेळी या संस्थेने विद्यापीठाचे अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर कुलगुरु डॉ.पेडणेकर यांनी सोनोपंत दांडेकर, चाफेकर महाविद्यालयाला भेट दिली व चर्चा केली.
मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र पालघर येथे होणार - कुलगुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:02 AM