वाडा : वाडा पश्चिम परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल दिलीप तोंडे यांना व त्यांच्या कर्मचा-यांना कार्यालयात घुसून श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठार मारण्याची धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्यासह ४० ते ५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी तोंडे यांनी वाड्याचा पोलिस निरीक्षकाकडे एका तक्रारीद्वारे केली आहे.
वनविभाग पश्चिम वाडा या कार्यालयाच्या क्षेत्रात वृक्ष लागवड करण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम काही आदिवासी मजुरांनी केले होते. डिसेंबर २०१८ दरम्यान केलेल्या या कामाची मजुरी मागण्यासाठी हे मजूर वाडा पश्चिमचे प्रभारी वनअधिकारी दिलीप तोंडे यांच्या कडे गेले होते. अवघ्या तीन ते चार मजुरांची मजुरी देणे बाकी असताना ४० ते ५० लोकांचा जमाव माझ्या कार्यालयावर चालून आला. या जमावाने पहिल्यांदा कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून माझ्या कॅबीनमध्ये मलाही शिवीगाळ केली. जमावाचा उद्देश माझ्यावर हल्ला करण्याचा असल्याचे लक्षात आले. त्यावेळी मी माझे पिस्तुल गनपाकीट मधून काढून कंबरेला लावले. परंतु जमावातील काही कार्यकर्ते श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्कात होते. कार्यकर्त्यांना ते चिथावणे देत असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यानंतर मी पोलिस ठाण्याशी संपर्क साधून संरक्षणाची मागणी केली. त्यानंतर पोलिस आल्यानंतरही पोलिसांसोबत ठाण्यात जात असतांना जमाव मला मज्जाव करीत होता. गाडीत बसायला गेलो असताना मला मागे खेचत अर्वाच्य शिवीगाळ सुरूच असल्याचे तोंडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, शिवीगाळ करणे, जमावाने मारहाण करणे, गुन्हा करण्यास उत्तेजन देणे या अंतर्गत श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित, कार्यकर्ते भरत जाधव, भाग्यश्री जाधव व मनोज (पूर्ण नाव माहीत नाही) यासह ४० ते ५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी दिलीप तोंडे यांनी वाडा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केली आहे.
आमचे कार्यकर्ते शांततेत मजुरीचे पैसे मागायला गेले असता वनअधिकारी दिलीप तोंडे यांनी आमच्या कार्यकर्त्यावर पिस्तुल रोखले याबाबतची तक्रार आम्ही पोलिस ठाण्यात दिली आहे. आमच्या न्याय हक्कांसाठी खोटे गुन्हे कार्यकर्त्यावर होत असतील तर असे शंभर गुन्हे आम्ही आमच्यावर घ्यायला तयार आहोत.- विजय जाधव,सरचिटणीस श्रमजीवी संघटना