जव्हार : महाराष्ट्र लोकसेवा अयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच लागला असून पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी जव्हार तालुक्यातील दोन विद्यार्थी शुभम मदने (राज्यात प्रथम, अनुसूचित जमाती प्रवर्गातून) यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे, तर वाळवंडा गावातील खडकीपाडा येथील कल्पेश चंदर जाधव (राज्यात दुसरा, अनुसूचित जमाती प्रवर्गातून) यांची तहसीलदार या पदावर निवड झाली असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत.या दोन्ही विद्यार्थ्यांनी जव्हारसारख्या आदिवासी दुर्गम भागातून शिक्षण घेऊन चांगले यश संपादन केले आहे. कल्पेश जाधव हे जव्हार तालुक्यातील वाळवंडा खडकीपाडा येथील असून त्याचे आई-वडील निरक्षर असूनही जिद्दीच्या जोरावर त्यांनी वयाच्या २१व्या वर्षी राज्य सेवा परीक्षेत यश संपादन करून पहिल्या प्रयत्नात सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास अधिकारी म्हणून निवड झाली होती. त्यानंतर कल्पेश जाधव यांनी पुन्हा राज्य सेवा परीक्षा दिली असून आता त्यांची तहसीलदारपदी निवड झाली आहे.जव्हार, मोखाडा येथील मध्यमवर्गीय कुटुंबातील शुभम मदने याचे वडील एसटी महामंडळात मेकॅनिकलचे काम करतात. आई गृहिणी तर वडिलांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. वडिलांची शिक्षणाविषयी इच्छा अपूर्ण राहिल्याने मनात खंत राहिली होती. ती पूर्ण करण्यासाठी शुभमने सलग अठरा तास अभ्यास करून हे यश मिळवले आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.>पालघर हा ग्रामीण आदिवासी जिल्हा असून आता ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रशासकीय सेवा स्पर्धा परीक्षांचा अवलंब करीत पुढे जात असल्याने मला खूप आनंद आणि गर्व वाटत आहे. अजूनही स्पर्धक तयार होऊन अधिकाधिक अधिकारी तयार व्हावेत, यासाठी आम्ही मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देऊ.- सुनील भुसारा, आमदार, विक्रमगड विधानसभा
जव्हारच्या दोन विद्यार्थ्यांचे राज्यसेवा परीक्षेत यश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 12:19 AM