मीरा रोड : लंडनहून आलेल्या मूळच्या भारतीय वकील दाम्पत्याचे रिक्षात हरवलेल्या बॅगेतील पाच लाखांचे दागिने रिक्षाचालकाने ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या काशिमीरा कार्यालयात बुधवारी आणून दिले. गुरुवारी सायंकाळी त्या दाम्पत्याने येऊन आपले दागिने परत घेतले. रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत त्या दाम्पत्याने पोलिसांचेही आभार मानले.बिपिनभाई पटेल हे जोगेश्वरीत राहणारे रिक्षाचालक १८ जुलैला सायंकाळी मीरा रोड भागात भाडे घेऊन आले होते. प्रवाशांना सोडल्यानंतर रिक्षाच्या मागील भागात बॅग असल्याचे त्यांच्या लक्षात आले. बॅग उघडली असता आत सोन्याचे दागिने होते. अंधेरीच्या यारी मार्गावरून पतीपत्नी व त्यांच्या लहान मुलाला मालाडच्या मॉलजवळ पटेल यांनी सोडले होते. त्याच प्रवाशांची बॅग असावी, असा त्यांना अंदाज आला. पटेल यांनी आपले रिक्षाचालक मित्र भूपेंद्र टेलर यांना हा प्रकार सांगितला. टेलर यांचा मुलगा अभिजित हा स्थानिक गुन्हे शाखेत उपनिरीक्षक असल्याने बॅग काशिमीरा शाखेत देण्यास सांगितले. पटेल यांनी बॅग आणून दिली.पोलिसांनी बॅगेची, रिक्षा व रिक्षाचालकाची माहिती मुंबई पोलिसांसह त्यांच्या सोशल मीडियात दिली. त्या माहितीवरून गुरुवारी सायंकाळी लंडनचे रहिवासी झालेले अॅड. जुल्फीकार लाकडावाला व त्यांची पत्नी अॅड. रचना यांनी गुन्हे शाखेचे कार्यालय गाठले. पोलिसांनी खातरजमा केल्यावर बॅग परत केली. लाकडावाला दाम्पत्य वर्सोवा येथे आपल्या आईवडिलांकडे आले होते. शिवाय, त्यांच्या एका नातलगाचे लग्न असल्याने त्यासाठी दागिने घेऊन ते मालाड येथे उतरले. पण, दागिन्यांची बॅग ते रिक्षातच विसरले होते. आंबोली पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रारही केली होती.
...अन् रिक्षावाल्यानं पाच लाखांचे दागिने केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:03 PM