तलासरी : शासकीय आश्रमशाळा वरवाडा येथे अकरावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय आदिवासी मुलीने आश्रमशाळेतून घरी पाठवल्याच्या मानसिक तणावातून शुक्रवारी सकाळी घरी आत्महत्या केली. सारिका राघू करबट (रा. घाडणे) असे तिचे नाव आहे. याबाबत तलासरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.गुरुवार, २८ नोव्हेंबर रोजी सकाळी आश्रमशाळेतील चार विद्यार्थिनी कोणालाही काहीही माहिती न देता आश्रमशाळेतून निघून गेल्या. यात सारिकाचाही समावेश होता. आश्रमशाळेच्या अधिक्षिका के.सी. मसराम यांनी याची माहिती मुख्याध्यापक एस.बी.पाटील यांना दिली. मुख्याध्यापक पाटील यांनी मुलीच्या पालकांना फोन करत याबाबत सांगितले. मुलींची शोधाशोध सुरू झाली. पण माहिती मिळत नसल्याने त्यांनी संध्याकाळी तलासरी पोलिसांनी याची माहिती देऊन तपास सुरू केला. रात्री या चारही मुलींचा ठावठिकाणा समजल्याने पोलीस आणि शिक्षकांनी रात्रीच डहाणूतील चरी कोटबी येथे जाऊन या मुलींना ताब्यात घेतले आणि त्यांच्या पालकांना बोलावून चौघींनाही त्यांच्याकडे सुपूर्द केले.सारिकाला घरी नेण्यासाठी तिचे काका सुरेश करबत व आई कमु हे दोघे आले होते. शुक्र वारी सकाळी आई कमु सारिकाला घेऊन शेतावर गवत कापावयास गेली. गवताचा भारा घरी टाकून परत ये असे तिने सारिकाला सांगितले. पण गवत घेऊन घरी गेलेली सारिका परत का आली नाही हे पहायला कमू घरी गेली असता सारिकाने घरातच गळफास घेतल्याचे दिसले.पोलिसांनी ठिकाण शोधलेसारिका आणि तिच्या तीन मैत्रिणी या वसई येथील शाळेत दहावीपर्यंत एकत्र शिकल्या. या चौघींनी एकत्रच वरवाडा आश्रमशाळेत प्रवेश घेतला. त्यांची घट्ट मैत्री होती. त्या गुरुवारी सकाळी आश्रमशाळेतून कोणालाही काहीही न सांगता आपल्या परिचिताच्या घरी गेल्या. तेथूनच एकीने घरी मोबाइलवरून फोन करून आम्ही सुखरूप आहोत. आमचा तपास करू नका, असे सांगितले. पोलिसांनी याच मोबाइल नंबरच्या साहाय्याने ठिकाण शोधून चौघींना शोधले.
आश्रमशाळेतून घरी पाठविल्याने आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 3:39 AM