टिटवाळा : पश्चिमेतील वासुंद्री रोडवरील साई प्रसाद सोसायटीतील मितेश जगताप (२१) याने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांच्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे.पोलिसांनी काही दिवसांपूर्वी रात्री गस्त घालत असताना दुचाकीवरून जाणाºया मितेशला हटकले होते. त्या वेळी त्याच्या दुचाकीला नंबर प्लेट नव्हती. कागदपत्रांची मागणी केल्यानंतर त्याने दुचाकी गॅरेजला दिली होती. त्यामुळे नंबर प्लेट काढून ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर, मितेशच्या वडिलांनी गाडीची कागदपत्रे आणून दाखवल्यानंतर पोलिसांनी त्याची दुचाकी परत दिली. मितेशचे वडील राजेश जगताप म्हणाले की, मितेश जॅकेट व मोबाइल मागण्यासाठी पोलीस ठाण्यात जात असे, तेव्हा पोलीस नाईक अनिल राठोड आणि पोलीस उपनिरीक्षक गणपत सुळे यांनी त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. त्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केली, असा आरोप मितेशच्या कुटुंबीयांनी करत या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. याबाबत पोलिसांकडे विचारणा केली असता, आम्ही गस्त घालत असताना तो परिसरात संशयितरीत्या आढळला. त्यामुळे त्याची विचारपूस केली. मात्र, त्याच्या मोबाइलमध्ये काही चोरट्यांचे नंबर असल्याने चौकशी सुरू होती. आम्ही मितेशला कोणताही मानसिक त्रास दिला नसून त्याच्या कुटुंबीयांच्या शंकेचे निरसन करण्यात येईल.
टिटवाळ्यात तरु णाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 5:01 AM