कासा : डहाणू तालुक्यातील कासा भागात दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे सूर्या नदीला मोठा पूर आला आहे. रस्ते पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.धामणी व कवडास धरणे भरल्याने धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची पातळी वाढवण्यात येत होती. रविवारी दुपारी धामणी धरणाचे पाचही दरवाजे १ .४५ मीटर उंचीने उघडले होते. त्यामुळे धरणातून २३ हजार २९९ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून त्याखालील कवडास धरणातून ४१ हजार ९१० क्यूसेक पाणी सुर्या नदीत सोडल्याने सूर्या नदीला मोठा पूर आला आहे. नदीने धोक्याची पातळी गाठली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला. सूर्या नदीवरील पेठजवळील पूल सहा दिवसांपासून पाण्याखाली आहे. दरम्यान, वाºयामुळे पेठ, वरोती, सारणी,सायवन अशा अनेक रस्त्यांवर झाडे पडली. वीज तारांवर झाडे पडल्याने १० तास वीजपुरवठा खंडित होता.
सूर्या नदीला आला पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 11:12 PM