जव्हार : कावळे आश्रमशाळेतील अधीक्षिकेविरोधात विद्यार्थिनींनी केलेल्या तक्रारीवरून अ.भा. आदिवासी विकास परिषदेने त्यांना हटवण्यात यावे अशी मागणी करत मंगळवारी जव्हार प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. ही मागणी मान्य करत प्रकल्प अधिकारी सौरभ कटियार यांनी बुधवारी अखेर अधीक्षिकेला पदावरून हटवले.कावळे शासकीय आश्रमशाळेतील मुली आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली, पालघर शाखा हे जव्हार प्रकल्प कार्यालयात दोन दिवस ठिय्या देऊन बसले होते. त्यामुळे सहा. प्रकल्प अधिकारी अनिल सोनावणे आणि भोईर यांनी चौकशी समिती स्थापन करून अधीक्षिका भाग्यशाली जोगदंड यांची चौकशी केली. समितीला त्या दोषी आढळल्या. ज्या मुलींनी तक्रार केली त्या आधारे शाळेतील इतर मुलींची चौकशी करण्यात आली, तेव्हा केलेली तक्रार खरी असल्याचे समोर आले. त्यानुसार प्रकल्प अधिकारी सौरभ कटियार यांनी जोगदंड यांच्यावर कारवाई केली. निलंबनाचे अधिकार ठाणे अप्पर आयुक्तांकडे असल्याने पुढील कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयात फाईल पाठविली आहे.पीडित मुलींनी न घाबरता पुढे येऊन तक्रार दाखल केली, अन्याय सहन केला नाही यासाठी प्रकल्प अधिकारी सौरभ कटियार यांनी या मुलींचे अभिनंदन केले. यापुढे असे होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, आणि सर्व आदिवासी आश्रमशाळांची चौकशी केली जाईल असेही ते म्हणाले. यापुढे अशी तक्र ार खपवून घेतली जाणार नाही असेही ते म्हणाले. कावळे आश्रमशाळेवरील शालेय व्यवस्थापन समिती बाबत ही तक्र ार केल्याचे संघटनेचे युवाध्यक्ष रामदास हरवटे यांनी सांगितले. त्यावर कारवाई करून नवीन समिती नेमली जाईल, असेही कटियार म्हणाले.प्रकल्प अधिकाऱ्यांनी आम्हाला न्याय दिला. आम्हाला खूप बरे वाटले.-सुनंदा भोये,विध्यार्थीनी प्रतिनिधीनिलंबनाची कारवाई न झाल्यास अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद पालघर शाखा प्रकल्प कार्यालयास टाळे ठोकले जाईल. यापुढे आदिवासी बहिणींवरील अन्याय सहन केला जाणार नाही- अक्षय मानकर, वाडा तालुकाध्यक्ष
ठिय्या आंदोलनाला यश : अधीक्षिका जोगदंड यांना अखेर हटवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 1:33 AM