पालघर : सातपाटी बंदरातून चार मच्छीमारांसह तीन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या बोटीचा यशस्वी शोध लावणाऱ्या सातपाटीमधील सहा धाडसी तरुणांचा सत्कार पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी सोमवारी केला. असेच सहकार्य यापुढेही अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
सातपाटी येथून गुरुवारी सकाळी मासेमारीसाठी समुद्रात गेलेली ‘अग्निमाता’ ही बोट इंजीनमध्ये बिघाड झाल्याने बेपत्ता झाली होती. कोस्टगार्ड, नेव्ही, सागरी पोलिसांच्या गस्ती नौकांना मिळू शकली नव्हती. परंतु, समुद्राच्या अंगावर दिवस-रात्र खेळणाऱ्या मच्छीमारांना भरती-ओहोटी, वाऱ्याचा वेग आदींबाबतचे अनेक बारकावे माहीत असल्याने हृषीकेश मेहेर, तुषार तांडेल, भारत पागधरे, गुरू गौड, प्रियेश मेहेर, राहुल पाटील या सहा तरुणांनी शनिवारी समुद्रात बेपत्ता असलेल्या बोट व त्यावरील सहा तरुणांचा काही तासांत शोध घेतला आणि त्या बंद पडलेल्या बोटीला आपल्या बोटीला बांधून यशस्वीरीत्या किनाऱ्यावर आणण्यात यश मिळविले होते. ‘लोकमत’ने या घटनेचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्यांच्या धाडसाचे कौतुक व्हावे व या शौर्यातून इतरांनी बोध घ्यावा, यासाठी सातपाटी सागरी पोलीस ठाण्याचे सपोनि सुधीर दहाळकर यांनी या तरुणांचा सत्कार करण्याची शिफारस पोलीस अधीक्षकांकडे केली होती.
सोमवारी हमरापूर येथील गोवर्धन इको व्हीलेज येथील कार्यक्रमात पोलीस अधीक्षक शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, शैलेश काळे, सपोनि सुधीर दहाळकर यांच्या उपस्थितीत सहा तरुणांचा सत्कार करून प्रशस्ति-पत्रकाद्वारे सन्मानित करण्यात आले.