वाडा : भिवंडी मनोर या महामार्गावरील वाडा येथे असलेल्या नाक्यावरील सुप्रीमकडून होत असलेली टोलवसुली सुरू राहील. मात्र त्यातून वसूल होणारी रक्कम या महामार्गाची निर्मिती, दुरूस्ती आणि देखभाल यासाठी वापरली जाईल, असा तोडगा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे व सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर , सार्वजनिक बांधकाम विभाग व आंदोलनकर्ती शिवसेना यांच्या बैठकीत आज काढण्यात आला.मौजे सापणे व मौजे करलगाव नजीकचा नदीवरील पूल तातडीने बांधण्यात यावा, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी होती. परंतु वनविभागाच्या मान्यतेसाठी तो प्रलंबित आहे. त्यामुळे ती मान्यता मिळताच त्याचे काम सुरू केले जाईल असे कंपनीने मान्य केल. कुडूस येथील ओव्हर ब्रीज शासनाने मंजूर करून घ्यावा त्याचेही काम सुरू केले जाईल असे कंपनीने मान्य केले.या कामासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाचा प्रस्ताव कार्यकारी अभियंत्यांनी मंंजूर करून द्यावा म्हणजे ते काम सुरू केल जाईल तसेच ज्यांच्या जमिनी या प्रकल्पात गेल्या परंतु त्यांना भरपाई मिळाली नाही त्यांना ती देण्याचा प्रस्ताव कार्यकारी अभियंत्यांनी शासनाकडे पाठवावा त्याला मंजुरी मिळताच संबंधित शेतकऱ्यांनी त्याबाबत आवश्यक त्या सर्व कागदपत्रे सादर केल्यावर तो त्यांना दिला जाईल असेही आज निश्चित करण्यात आले.या चर्चेत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सुप्रीमचे उपाध्यक्ष झहीर अहमद शेख, शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील व अन्य सहभागी झाले होते.
सुप्रीमची वाडा टोलवसुली राहणार सुरूच दुरूस्तीची सामग्री, मनुष्यबळ वाढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 12:02 AM