शोकत शेख, डहाणू पालघर तालुक्यातील सुर्यानगर येथून शहापूर येथे हलवलेले सूर्याच्या प्रकल्पाचे कार्यालय बड्या प्रयत्नांनी पुन्हा पालघर जिल्हयात आणले जाणार आहेत. सूर्याच्या नदीवर बांधण्यात आलेले कवडास आणि धामणी ही दोन्ही धरणे पालघर जिल्हयात असूनही त्यांच्या कार्यकारी अभियंत्यांचे कार्यालय मात्र शहापूर येथे असल्यामुळे शेतकऱ्यांना आपली कामे करण्यासाठी शहापूरला जावे लागत होते. सूर्या नगर येथे केवळ उपअभियंता यांचेच कार्यालय होते. त्यामुळे त्यांना मर्यादित अधिकार असल्यामुळे गळती, पाटाची दुरुस्ती देखभाल यावर अनेक बंधने येत होती. परिणामी सूर्यांच्या कालव्यांना ठिकठिकाणी भगदाडे पडून शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागत होते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी शहापूर येथील हे कार्यालय डहाणू अथवा पालघर येथे स्थलांतरीत करावे अशी मागणी केली होती. त्यानुसार हे कार्यालय पुन्हा पालघर जिल्ह्यात स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरु झाल्याचे संकेत मिळत असून १ जानेवारी रोजी हे कार्यालय मनोर येथे स्थलांतरित होणार असल्याचे वृत्त आहे. पाटाला अनेक भागात भगदाड पडल्याने शेतकरी पाण्यापासून वंचित होते. या बाबीबरोबर वेळोवेळी वृत्ते प्रसिद्ध केल्यानंतर त्याची दखल घेऊन पाटाची बांधबंदिस्ती करण्यात आली आहे. तसेच १५ डिसेंबरपासून सूर्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. कार्याकारी अभियंता दुसाणे यांनी आपल्या अधिकारीवर्गासह प्रत्यक्ष. पाहणी केली असून त्यांनी कालव्यांच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे.
सूर्याचे कार्यालय पालघर की डहाणूत?
By admin | Published: December 10, 2015 1:45 AM