शशी करपे/लोकमत न्यूज नेटवर्कवसई : तालुक्यातील अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीत लाखो रुपयांचा घरकुल आणि शौचालय घोटाळा झाल्याचे उजेडात आले आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेने ग्रामसेविकेला निलंबित केले आहे. मात्र, सरपंच, उपसरपंच आणि एका महिला सदस्यांविरोधात कारवाईचा अहवाल देऊनही कोकण आयुक्तांनी अद्याप कोणतीच कारवाई केलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात पंचायत समितीमधील काही अधिकारी-कर्मचारी गुंतलेले असताना त्यांच्यावर कोणतीच कारवाई न करता त्यांना अभय देण्यात आल्याचा आरोप केला जातो. निर्मल भारत अभियानांतर्गत तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींना घरकुल आणि शौचालये बांधण्यासाठी तीन कोटींहून अधिकचा निधी देण्यात आला. याकामात खोटी बिले दाखवून प्रत्यक्षात शौचालये आणि घरकुले न बांधता लाखो रुपयांचा अपहार केल्याचे उजेडात आले आहे. याप्रकरणी वसई पंचायत समितीच्या सभापती चेतना मेहेर यांनी पुराव्यासह तक्रार केलेल्यानंतर जिल्हा परिषदेने वसई पंचायत समितीमार्फत चौकशी केली होती. या चौकशीतही अपहारावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका मधुरा निकम यांना १९ डिसेंबर २०१६ रोजी निलंबित केले. तर ३१ डिसेंबर २०१७ रोजी त्यांनी कोकण आयुक्तांना अहवाल पाठवून अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीच्या सरपंच भारती वैती, उपसरपंच विजय मेहेर यांनी अपहार केल्याने त्यांनाही पदावरून दूर करण्याची शिफारस केली होती. लाखो रुपयांचा अपहार करून सरकारची फसवणुक केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींवर फौजदारी गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. मात्र, फक्त ग्रामसेवकांवर कारवाई करून लोकप्रतिनिधींना अभय देण्यात आले आहे. यात वसई पंचायत समितीतील काही अधिकारी-कर्मचारीही गुंतलेले आहेत. मात्र, त्यांना वाचवण्यात आल्याचा आरोप सभापती चेतना मेहेरे यांनी केला आहे. वसई पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी फक्त शौचालय बांधकाम अपहार झाल्याप्रकरणाचा अहवाल दिला आहे. प्रत्यक्षात खोटी घरकुले दाखवून त्यातही लाखो रुपयांचा अपहार करण्यात आलेला आहे. मात्र, याचा अहवाल लपवून ठेवण्यात आल्याचा आरोपही मेहेर यांनी केला आहे.
घोटाळेबाज ग्रामसेविका निलंबित
By admin | Published: June 03, 2017 6:09 AM