अनिरु द्ध पाटील / डहाणू/बोर्डीआर्थिक क्षेत्रानंतर शैक्षणिक क्षेत्रात सर्जिकल स्ट्राईक करण्याचा निर्णय शासनाच्या चांगलाच अंगलगट आला असून तीव्र विरोधामुळे सेल्फनेच हजेरी नोंदविण्याचा तुघलकी फतवा सरकारला आज अखेर मागे घ्यावा लागला. शालेय शिक्षणमंत्र्यांनी ही घोषणा केल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात आनंद व्यक्त होत आहे. या फतव्या विरोधात लोकमतनेच गेले पाच दिवस सातत्याने आवाज उठविला होता.महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये ९ जानेवारीपासून दर सोमवारी विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढून पाठविण्याचा आदेश शिक्षण विभागाने काढला होता. त्यानंतर विविध शिक्षक संघटनांनी त्याला विरोध दर्शवून तालुकास्तरावर गटविकास अधिकाऱ्यांना तर जिल्हास्तरावर मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन बहिष्कार टाकला होता. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील शिक्षकांनी आपली नाराजी स्पष्टपणे उघड केली होती. दरम्यान सेल्फीला वाढता विरोध लक्षात घेता शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तूर्तास या निर्णयाला स्थगिती दिल्याचे जाहीर केले. त्यानंतर राज्यभरासह डहाणू तालुक्यातील शिक्षकांनी आनंद व्यक्त केला व याबाबत प्रसिद्ध केलेल्या वृत्तमालिकेबद्दल लोकमतचे आभार मानले. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. हा निर्णय मागे घेतल्यामुळे पुन्हा एकदा नव्या उमेदीने कामाला लागण्याचा विश्वास जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मनोज मोरे यांनी व्यक्त केला.
सेल्फी हजेरीला स्थगिती; शिक्षकांमध्ये आनंदोत्सव
By admin | Published: January 12, 2017 5:57 AM