वाडा : तालुक्यातील रस्ते दुरुस्ती व डोंगस्ते येथील श्री जी स्टोन क्रशरमुळे ध्वनी व वायुप्रदूषण होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे क्रशर बंद करावे, तसेच अन्य मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारपासून वाडा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.या आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमान संघटनेचे पालघर जिल्हाध्यक्ष जितेश पाटील व वाडा तालुकाध्यक्ष रवींद्र भेणे करीत आहेत. कोंढले ते सापरोंडे फाटा, कुडूस ते चिंचघर या रस्त्यांची दुरवस्था झाली असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते. कोंढले-सापरोंडे या नवीन रस्त्याचे काम ठेकेदाराने संथगतीने केल्याने रस्त्याचे काम अपूर्ण आहे. या अपूर्ण कामामुळे वाहनचालकांसह नागरिकांचे हाल होत आहेत. तसेच कुडूस-चिंचघर हा रस्ता मे महिन्यात केला असून तो आता पूर्णपणे उखडला असून जागोजागी खड्डे पडले आहेत. निकृष्ट काम केल्याने हा रस्ता खड्ड्यांत गेला आहे. या दोन्ही रस्त्यांची कामे केलेल्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानने केली आहे.स्वाभिमानचे जितेश पाटील, रवींद्र भेणे, स्वप्नील जाधव व संतोष कातकरी या कार्यकर्त्यांनी हे उपोषण सुरू केले असून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा उपोषणकर्त्यांचा निर्धार आहे.
स्वाभिमान संघटनेचे बेमुदत उपोषण सुरू
By admin | Published: August 10, 2015 11:32 PM