पारोळ : मे ते ऑक्टोबरपर्यंत वसई-विरारमध्ये धुमाकूळ घातलेल्या कोरोनाला हद्दपार करण्यात वसईच्या ग्रामीण भागाला यश आले आहे. सध्या ग्रामीण भागात कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याने ही दिलासादायक बाब ठरली आहे.साधारणत: एप्रिल-मे महिन्यात वसई-विरारमध्ये कोरोना वेगाने पसरत असताना ग्रामीण भागाला त्याची झळ बसली नव्हती. मात्र, जूनमध्ये टाळेबंदी शिथिल केल्यानंतर ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. ऑक्टोबरपर्यंत ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली होती. नोव्हेंबरमध्ये कोरोनाचा आलेख खाली आल्यानंतर शहरी भागातून कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर होता. मात्र, दिवाळीत सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजल्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली होती. आता पुन्हा शहरी भागातून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. लवकरच शहरी भागही कोरोनामुक्त होईल, अशी आशा वसईकरांना वाटते. दरम्यान, वसई पूर्व ग्रामीण भागात आतापर्यंत एक हजार ३६७ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यात ४९ जणांचा बळी गेला आहे. तर उपचार घेत असलेले एक हजार ३१८ रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी पोहोचले आहेत. ग्रामीण भागातून कोरोना हद्दपार झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. कोरोना नष्ट झाला असला तरी ग्रामीण भागातून शहरी भागात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शहरी भागात कोरोनाचा फैलाव सुरूच आहे. तर ग्रामीण भागातून नऊ महिन्यांत पहिल्यांदाच कोरोनामुक्तीची बातमी ऐकायला मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
वसईच्या ग्रामीण भागातून कोरोना हद्दपार करण्यात यंत्रणेला आले यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 12:08 AM