- पंकज राऊतबोईसर : पालघर लोकसभा मतदारसंघाची मे २०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या राज्यात राज्यमंत्री पद भूषविलेल्या राजेंद्र गावित यांनी वर्षभरात प्रथम काँग्रेसमधून भाजपात आणि आता शिवसेनेत उडी मारली.या तीनही पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये आता संभ्रमावस्था निर्माण असून ‘कुणाचा झेंडा घेऊ हाती’ असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. सत्तेसाठी चाललेल्या खेळात नेते राजकारण करतात पण निष्ठावंताचा जीव जातो, अशी परिस्थिती आहे. प्रथम धर्मनिरपेक्ष मग कट्टर हिंदुत्व व आता हिंदुत्वाबरोबरच मराठी बाण्याचा झेंडा उचलून गावित लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत.खासदार स्व. चिंतामण वनगा यांच्या अकस्मात मृत्यूनंतर भाजपाने वनगा कुटुंबाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांचे सुपूत्र श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेत प्रवेश केला, तेव्हाही भाजपा कार्यकर्त्यांची अशी परिस्थिती झाली होती. वनगा यांच्या नावाने भाजप तसेच शिवसेना या दोन्ही पक्षांनी त्या वेळी राजकारण सुरू केल्यानंतर ती पोटनिवडणूक न लढता सर्व पक्षांनी एकत्र बसून उमेदवार निवडून द्यावा आणि पालघर जिल्ह्याला विकासासाठी राज्य सरकारने विशेष पॅकेज द्यावे, असे आवाहन आ. हितेंद्र ठाकूर यांनी केले होते. मात्र, ठाकुरांच्या या आवाहनाला कुणी फारसे गांभीर्याने घेतले नाही.आदिवासी भागात ३८ वर्षे सेवा करणाऱ्यांच्या मृत्यूनंतर पोटनिवडणूक बिनविरोध न होणे अत्यंत खेदजनक हे अत्यंत खेदजनक असल्याची प्रतिक्रि या त्यावेळी व्यक्त होत होती. तेव्हा जशी संभ्रमावस्था होती, तशीच आताही निर्माण झाली आहे.
कुणाचा झेंडा घेऊ हाती; नेत्यांच्या राजकारणात निष्ठावंतांचा जातो जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 12:24 AM