पालघर - तालुक्यातील किल्ल्याच्या संवर्धनाचा ध्यास घेतलेल्या सह्याद्री मित्रच्या शिलेदारांनी रविवारी सफाळे जवळील तांदुळवाडी किल्ल्याची वारा पावसाची तमा ना बाळगता संवर्धन व स्वछता मोहीम राबवली.तालुक्यातील माकुणसार, केळवे आणि खारेकुरण येथून आलेल्या तरूणांनी किल्ल्यावरील पश्चिम कड्यावरील दगडांच्या कपारीत असेलेल्या कुंडातील दगड आणि चिखल, गाळ काढून त्याची पूर्णत: सफाई केली. तसेच गडावर येणाऱ्या पर्यटकांना मार्गदर्शक ठरावेत म्हणून वाटेवर विविध ठिकाणी दिशादर्शक चिन्हे रेखाटण्यात आली.इतिहासात वैतरणा प्रांताचा खडा पहारेकरी अशी बिरुदावली मिरविणारा आणि आजही आपल्या अंगाखांद्यावर गौरवशाली इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारा हा किल्ला तितकाच मनमोहक आणि दिमाखदार रित्या उभा आहे. मात्र इतिहासाच्या या खुणा पुसण्याचे आणि त्याला अपवित्र करण्याचे कार्य आजच्या काही तरु णा कडून केले जात असून किल्ल्यावर मद्यपान करून, जुगाराचे अड्डे बनवून माठ्या प्रमाणात बाटल्या फेकून दिल्या जात आहेत. गडावरील पाण्याच्या कुंडांमध्ये सर्रास पोहण्याचे प्रकार खूपच वाढले असून पर्यटनाच्या नावाखाली नासधूस करणाºयांवर कारवाईची मागणी केली जात आहे.तांदुळवाडी किल्ला आपल्या गौरवशाली इतिहासाचा आणि आपल्या पूर्वजांच्या पराक्र माचा ठेवा आहे. त्याचा उपयोग मद्य पिण्यासाठी, पार्टीसाठी आणि गैरप्रकार करण्यासाठी करू नये. त्याचे रक्षण आपणच करायला हवे. असे मत ‘सह्याद्री मित्र’ संस्थेचे दीपक पाटील यांनी व्यक्त केले.
तांदुळवाडी किल्ला केला चकाचक, सह्याद्री मित्रांची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 2:06 AM