वाडा : जव्हार, मोखाडा तालुक्याप्रमाणेच वाडा तालुक्यातील पन्नासहून अधिक गाव, पाडे भीषण पाणी टंचाईने होरपळून निघाले आहेत. सध्या अवघ्या चार टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. ही संख्या अपुरी पडत असल्याने ती वाढविण्याचा प्रस्ताव ठेकेदाराला पंधरा दिवसांपूर्वी देऊनही त्याने केलेल्या हलगर्जीपणामुळे येथील २० ते २२ गाव-पाड्यातील नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.
वाडा तालुक्यातील भीषण पाणी टंचाई लक्षात घेऊन येथील गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे यांनी या तालुक्यातील ३५ गाव-पाड्यांवर चार टँकरने पाणी पुरवठा सुरु केला आहे. मात्र हे चार टँकरही अपुरे पडत असून अनेक पाड्यांवर तीन ते चार दिवसांनी टँकर जात आहे.वाडा तालुक्यातील नव्याने पाणी टंचाईग्रस्त असलेली चेंदवली, तोरणे, धावरपाडा, ओगदा ग्रामपंचायत अंतर्गत मुहुमाळ, ताडमाळ, करांजे गाव अंतर्गत येणारे खडकपाडा, धिंडेपाडा, पाटीलपाडा तसेच सापणे गावचे चार पाडे, फणसगांव (ओगदा) अशा अनेक पाड्यांवरील नागरिक गेल्या महिनाभरापासून भीषण पाणी टंचाईला तोंड देत आहेत. या गांव-पाड्यांना टँकरने पाणी पुरवठा सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी पालघर यांनी मंजुरी दिली आहे.वाडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी तत्काळ (१६ मे) पालघर जिल्ह्याला टँकरने पाणी पुरवठा करणारे टँकर ठेकेदार यांना पत्र देऊन येथील टंचाई ग्रस्त गांव-पाड्यांवर दोन टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत.
मात्र गेले पंधरा दिवस होऊनही संबंधीत ठेकेदाराने टँकर सुरु न केल्यामुळे येथील पंधराहून अधिक टंचाईग्रस्त गांव-पाड्यातील नागरीकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. अनेक ठिकाणी तर दीड ते दोन किलोमीटर अंतरावरु न पाणी येथील महिलांना आणावे लागत आहे.
पाण्याअभावी हागणदारी सुरु
वाडा तालुक्यातील आदिवासी व दुर्गम भागातील हगणदारी मुक्ततेसाठी शासनाने शंभर टक्के अनुदानाने हजारो लाभार्थ्यांना शौचालये बांधून दिली आहेत. मात्र पाणी टंचाईमुळे ही शौचालये बंद पडली असून पाण्याअभावी अनेकजण आज उघड्यावरच शौचास जात आहेत.दरम्यान देवळी, आपटी, गोऱ्हे तसेच वाडा शहरातील काही नगरांमधील काही नागरिक बैलगाडी, लहान टँकरने येणारे पाणी रोज ५० ते १०० रुपयांचे एक बॅरल (२०० लीटरची टाकी) याप्रमाणे विकत घेत आहेत. पाण्यासाठी हजारो रु पये मोजावे लागत असल्याने येथील नागरिक शासन व प्रशासनावर संताप व्यक्त करीत आहेत.