पारोळ : दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे तानसा नदीने धोक्याची पातळी गाठली असून बुधवारी पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्याने या भागातील १२ गावांचा संपर्क तुटला आहे. तानसा नदीचे पाणी या भागातील शेतांमध्ये घुसल्याने या परिसरातील शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली जात पूरस्थिती निर्माण झाली आहे. भात लावणीच्या हंगामातच शेती पाण्याखाली गेल्याने दोन दिवसांपासून लावणीच्या कामांना ब्रेक दिला आहे. आठवडाभर पावसाने विश्रांती घेत बळीराजाची चिंता वाढवली होती. पाऊस सुरू होताच भात लावणीची कामे सुरू होतील, अशी आशा बळीराजाला असतानाच मंगळवारी रात्री पावसाची सुरुवात तर झाली मात्र, तीच संततधार बुधवार व गुरुवारीही कायम ठेवून शेतीची कामे बंद ठेवण्याची वेळ आली.
तानसा नदीवरील पांढरतारा पुलाची उंची कमी असल्याने नदीत पाण्याची पातळी वाढताच तो पाण्याखाली जात पलीकडे जाण्याच्या मार्ग बंद झाल्याने गावकरी यांची मोठी गैरसोय होते. कामगारांना कामाला व मुलांना शाळेला दांडी मारावी लागते. या पुलाची उंची वाढावी म्हणून अनेक वर्षांपासून मागणी होत असताना मात्र प्रशासन पुलाच्या उंचीबाबत दुर्लक्ष करत असल्याने बाधित गावातील नागरिकांमध्ये संताप आहे.
त्याचप्रमाणे वसई तालुक्यात पाचशे हेक्टरच्या आसपास जमिनीवर भात पीक घेतले जाते. पण दरवर्षी तानसा नदीला पूर आल्याने शेती पाण्याखाली जात शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. नुकसानभरपाईसाठी पंचनामे प्रशासन करते, पण मदत मात्र मिळत नाही. तसेच पीक विम्याबाबतही शेतकºयांमध्ये जनजागृती होत नसल्याने अनेक शेतकºयांना पीक विम्याचाही लाभ घेता येत नाही. विदर्भ, मराठवाडा येथील शेतकºयांना भरपाई मिळते मग वसईतील भात शेतकºयांना का मिळत नाही, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
विक्रमगडमध्ये जोरदार पाऊसविकमगड : आठवड्याभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाने मंगळवारपासून विक्रमगड तालुक्यात जोरदार हजेरी लावली आहे. सलग दोन दिवस सातत्याने पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्ग आवणीच्या कामात व्यस्त झाला आहे. पाण्याची गरज असल्याने आवणीला वेग आला आहे. पावसाचा जोर लक्षात घेता काही शाळाना लवकरच सुट्टी देण्यात आली.