बोईसर - रेल्वेच्या विस्कळीत सेवेमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनच्या अत्यल्प उपस्थिती मूळे तारापूरच्या उद्योगांमधील उत्पादनावर व बोईसर परिसरातील बँका व इतर आर्थिक संस्थाच्या व्यवहारावर गंभीर परिणाम होऊन सर्व व्यवस्था कोलमडल्या होत्या तर काही बँकाना चक्क कुलूप होते.सलग पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र पुर परिस्थिती निर्माण होऊन रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग तसेच जिल्ह्यातील मुख्य व अंर्तर्गत रस्त्यांवर पाणीच पाणी साचून रेल्वे व रस्ते वाहतूक प्रथम धिम्यागतीने होऊन हळू हळू ठप्प झाल्याने पूर्णपणे विस्कळीत झाली होती. त्याचा परिणाम सर्व उद्योग व्यवसायांवर झाला असून गुरुवारी जरी काही प्रमाणात परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी ती सुरळीत होण्यास अवधी लागणार आहे.तारापूर एमआयडीसीमधील औद्योगिक क्षेत्रात लहान -मोठे सुमारे साडेबाराशे कारखाने व सुमारे पन्नास बँका व इतर आर्थिक संस्था असून तेथे काम करणारे बहुसंख्य अधिकारी, कर्मचारी व कामगार हे गुजरात महाराष्ट्र बॉर्डर ते डहाणू, वसई, विरार, मुंबई ते थेट ठाण्यापासून येत असतात. रेल्वेसेवा व मुंबई - अहमदाबाद महामार्ग ठप्प झाल्याने बोईसर मधील अनेक बँका, आर्थिक संस्था, शासकीय कार्यालये, विमा कार्यालयांमध्ये उपस्थिती फारच कमी होती त्यामुळे आर्थिक व्यवहारही थंड तर काही ठिकाणी ठप्प झाले होते.मंगळवार (दि. १० ) सकाळी सहा पासून बोईसरला रेल्वे सेवा विस्कळीत होऊन हळूहळू पूर्ण थांबली. ती बुधवारी २४ तासाने म्हणजे सकाळी 06.32 वाजता सुरु झाली.प्रथम विरारच्या दिशेने लोकल धावली तिही अत्यंत धीम्या गतीने तर संध्याकाळ पर्यंत नियमित वेळापत्रकीप्रमाणे (शेड्युल) रेल्वेगाड्या धावत नव्हत्या.मंगळवारी बोईसर रेल्वे स्थानकात बांद्रा - लखनऊ एक्सप्रेस व निजामुद्दीत - त्रिवेंद्रम एक्सप्रेस स्थानकांमध्ये थांबवुन ठेवण्यात आल्या होत्या.
रेल्वेच्या विस्कळीत सेवेमुळे तारापूरच्या उद्योगांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 2:46 AM