- पंकज राऊतबोईसर : तारापूर अणुऊर्जा प्रकल्पामध्ये नोकर भरतीसाठी रविवारी मुंबईत लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्रही बसले होते. मात्र,परीक्षेत त्यांना मुद्दाम नापास करून इतर राज्यातील मुलांना नोकरीत प्राधान्य दिल्याने संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्रांनी अणुऊर्जा केंद्राकडे कर्मचाऱ्यांना सोमवारी सकाळी घेऊन जाणा-या पाच बसेस अडवून फोडल्या व रस्ता अडवून धरला.तारापूर अणुऊर्जा केंद्र एक व दोन मध्ये Stipendiary Trainee (Technical) -cat.ko) या पदावरील जागेकरिता प्रीलीमिनरी टेस्ट व अॅडव्हान्स टेस्ट अशा परिक्षा रविवारी मुंबईतील कांदिवलीच्या ठाकूर व निर्मला कॉलेजमध्ये घेण्यात आली. ही भरती तारापूर अणुऊर्जा केंद्रासाठी होती. परंतु परिक्षा मात्र संपूर्ण भारतात घेण्यात आली. त्याकरिता तारापूर प्रकल्पग्रस्तांसह पालघर जिल्ह्यातील स्थानिक अशा शेकडो उमेदवारांची लेखी परिक्षा घेण्यात आली. त्यामध्ये फक्त एकच उमेदवार पास तर उर्वरित इतर राज्यातील उमेदवार पास झाले.तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प तीन व चार च्या उभारणी करिता आमची घरे व शेत जमिनी व मच्छीमारांचे समुद्र किनारे हिरावून घेऊनही, नोकरीत डावलले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यात महिलांचा सहभाग मोठा होता. जोपर्यंत आम्हाला प्रकल्पात कायमस्वरूपी नोकरी संदर्भात लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही रास्ता रोखून धरू असा निर्धार करून प्रकल्पग्रस्त रस्त्यावर बसून होते.
तारापूरच्या प्रकल्पग्रस्तांनी बसेस फोडून रस्ता रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 6:19 AM