बोईसर : तारापूर एमआयडीसीमधील रासायनिक कारखान्यातील एका कंत्राटी कामगाराला बुधवारी सकाळी वायूबाधा झाल्याने त्याला भोवळ आली. मात्र, कारखाना व्यवस्थापनाने या घटनेचा इन्कार केला असून तो कामगार अगोदरच आजारी असल्याचे सांगितले. तर सदर कामगाराला एमआयडीसीतील तुंगा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले असून त्याच्या प्रकृतीचा धोका टळल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.तारापूर येथील साळवी केमिकल्स या कारखान्यात ३ ते ४ महिन्यापासून कंत्राटी पद्धतीवर काम करणारा राहुल कुमार (२१) याला बुधवारी सकाळी कारखान्यात काम करीत असताना वायूचा वास आल्याने चक्कर आली. तो तेथेच बसला. नंतर गेटवर आला असता तो पडल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, त्या कारखान्यासमोरून जाणाऱ्या काही जणांना गेट बाहेर पडलेला कामगार दिसताच त्यांनी तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू केले.या संदर्भात कारखान्यातील मॅनेजर गिरी यांच्याशी संपर्क साधला असता हा कामगार चार - पाच दिवसांपासून आजारी होता. त्यामुळे तो कामावर येत नव्हता. आजदेखील त्याला काम करू नको, असे सांगितल्यावरही तो कामाला लागला. मात्र, त्याच्या तब्ब्येतीला त्रास होऊ लागल्याने तो गेट पास घेऊन घरी जात होता. बोईसर पोलीस आणि औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचनालयाचे अधिकारी या घटनेचा तपास करीत आहेत.
तारापूरला एका कामगाराला वायूबाधा झाल्याचा संशय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 11:25 PM