वसई - कोकण किनारपट्टीवर आलेले तौक्ते चक्रीवादळ आणि त्यांने केलेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी बुधवारी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वसई-विरार शहराची पाहणी करून आढावा घेतल्याची माहिती आजीव पाटील यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळचा वसईच्या किनारपट्टीलाही जोरदार तडाखा बसल्याचे पाहायला मिळाले होते. वसई-विरार शहरात अतिवृष्टी आणि जोरदार वाऱ्यामुळे वीज आणि पाणी पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे.
पालघर, तसेच वसई-विरार शहराला या वादळाचा अधिक फटका बसला आहे. यात काही ठिकाणी पाणी साचले, 300 हुन अधिक झाडे उन्मळून पडली, मुख्य तसेच छोटे रस्तेदेखील बंद पडले. तर अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला. मुसळधार पावसानंतर अशी परिस्थिती भविष्यात पुन्हा उद्भवू नये, यासाठी महापालिका प्रशासन स्तरावर नेमक्या काय उपाय योजना करता येतील, याच्या पाहणीसाठी वसईचे आमदार तथा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर व पक्षाचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी बुधवारी सकाळी वसई-विरार शहराची पाहणी केली.