पालघर : शाळेत पंखा लावण्याच्या कारणावरून नववीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरोधात केळवे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय आगरवाडी येथे हा प्रकार घडला. सफाळे-वेढी येथील गणेश लोहार या नववीतील विद्यार्थ्याला २४ डिसेंबर रोजी सकाळी वर्ग भरल्यानंतर महेश राऊत या शिक्षकाने वर्गात पंखा कुणी लावला, याचा जाब विचारला. सरांचा चढलेला पारा पाहता, एकही विद्यार्थी पुढे आला नाही. अनेक वेळा विचारूनही कुणी उत्तर देत नसल्याने, संतप्त झालेल्या राऊत यांनी लाइट बोर्डाच्या खाली बसलेल्या गणेशला समोर बोलावले. त्याला याबाबत जाब विचारल्यानंतर पंखा लावला नसल्याचे सांगूनही शिक्षकाने त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा उजवा डोळा सुजून पूर्ण लाल-काळा पडला.घरी परत आल्यावर प्रचंड दडपणाखाली असणारा गणेश एका कोपºयात पडून होता. मजुरीच्या कामावरून संध्याकाळी घरी परतलेल्या आईवडिलांनी त्याला सुजलेल्या डोळ्याबाबत विचारले, पण काहीही कारण न देता पडून राहिला. आठवडाभर तो शाळेत न आल्याने त्याचे काही मित्र त्याला पाहायला घरी गेले. त्या वेळी गणेशच्या आईने त्याच्या मित्रांकडे विचारपूस केल्यानंतर त्यांना सर्व हकिकत कळली.दरम्यान, गणेशच्या डोळ्यात रक्त साकळल्याने त्याला अस्पष्ट दिसू लागल्याने, त्याच्या आईने शाळेत जाऊन शिक्षकाला जाब विचारला. आपण मुलाला मारहाण केल्याचे कबूल करून, त्याचा सर्व वैद्यकीय खर्च करायला मी तयार आहे, परंतु हे प्रकरण पुढे नेऊ नका, अशी विनवणी त्याने पालकांना केली. त्यानंतर, सागर सुतार या सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पालकांनी सरळ केळवे पोलीस स्टेशन गाठले.गणेशचे आईवडील मोजमजुरी करून, आपल्या मुलाने उच्चशिक्षण घ्यावे म्हणून झटत आहेत. क्षुल्लक गोष्टीतून डोळा जायबंदी होईस्तोवर मुलाला मारहाण करण्यात केल्याने त्याने शिक्षकाचा धसका घेतला आहे. तो आता शाळेत जायलाही घाबरत आहे. आपल्या मुलाचे शैक्षणिक नुकसान होण्याची वेळ उद्भवली असून, केळवे पोलिसांनी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.मला राऊत सरांनी केलेल्या मारहाणीत डोळा सुजल्यानंतर तू कुठे तरी पडला असे सांग. मी मारल्याचे सांगितले तर बघून घेईन, असा दम दिला.- गणेश लोहार (विद्यार्थी)
पंखा लावल्याने शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2019 2:04 AM