डहाणू/बोर्डी : अंधेरीच्या परांजपे विद्यालयातून शालांत शिक्षण पूर्ण करताना विज्ञानासह इतिहास, भूगोल आणि भाषा हे विषय आवडीचे होते. पूर्वीचे पार्ले आणि आताच्या साठे कॉलेजात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करताना, केमिस्ट्री हा माझा आवडता विषय होता. दरम्यान शैक्षणिक गुणवत्तेसह आयुष्यातील आव्हाने पेलण्याचे धडे शिक्षकांकडून मिळाल्यानेच आपले व्यक्तिमत्त्व घडले. आपल्यावर केवळ एक नव्हे तर अनेक शिक्षकांचा प्रभाव असल्यानेच हे यश पदरी पडल्याची कृतज्ञता यंदाचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्यानंतर डहाणूचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि राष्टÑपती पुरस्कार विजेते मंदार धर्माधिकारी यांनी व्यक्त केली आहे. हे भाग्य ज्या विभूतींमुळे लाभले त्या सर्व शिक्षकांची नावे त्यांना आजही तोंडपाठ आहेत.३१ वर्षांच्या सेवा काळात गुणवत्तापूर्ण सेवेकरिता राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले, हा खरे तर खूप मोठा क्षण! ३१ वर्षांच्या सेवाकाळात २०१७ मध्ये पोलीस महासंचालक पदक, तर यंदा राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले. राष्टÑपती पुरस्कार मिळाल्याचे कळताच, इतिहासाचे शिक्षक शशिकांत जुन्नरकर यांनी अभिनंदनाकरिता फोन केला. ते नव्वदीकडे झुकले आहेत. परांजपे विद्यालयातील धुरूबाई, जुवेकरबाई, कुलकर्णी बाई, जोगळेकर बाई, मालशे बाई, गोखले बाई, नाईक सर यांच्या विषयीचा जिव्हाळा कायमच टिकून आहे. शिक्षकांनी घडविल्यानेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात नाव लौकिक मिळविला आहे. या सर्वांशी आजही ऋणानुबंध टिकून आहेत.व्यक्तिमत्त्व घडविण्यात सर्व शिक्षकांचा हातभारपरांजपे शाळा ही मराठी माध्यमाची शाळा. मात्र आठवीपासून शाळेने इंग्लिश मिडियम सुरू केले. तेव्हा आमची ही पहिलीच बॅच. मराठी माध्यमातील शिक्षकांनी इंग्रजीतून शिकवताना अपार कष्ट घेतले. केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे तर व्यवहारी ज्ञानात तरबेज होऊन बाहेरच्या जगात आपला विद्यार्थी सक्षमपणे वावरला पाहिजे याकडे सर्वांनीच विशेष लक्ष दिले.कॉलेजात असताना रसायन शास्त्र हा विषय आवडायचा त्याचे कारण शिक्षक हेच होते. या काळात कौटुंबिक परिस्थितिमुळे शिक्षणात अडथळे आले, नोकरी करण्याची गरज भासली होती. त्यावेळी गुरुवर्यांनी दिलेल्या शिकवणुकीचा तसेच आधाराचा मोठा लाभ झाला. तेव्हा आता सारखं महागडं शिक्षण नव्हतं. ते आमच्या आवाक्यात होतं. कौटुंबिक परिस्थितीने नोकरी करण्याची वेळ आली होती. एका कंपनीत मुलाखतही दिली होती.अपघातानेच आलो या क्षेत्रातपोलीस विभागात नोकरी करेन असं वाटलं नव्हतं, मात्र मित्रांनी परीक्षेचा फॉर्म भरला आणि अपघातानेच या क्षेत्रात आहे. १९८८ च्या बॅचच्या सरळ सेवेत मी एकमेव पोलीस अधिकारी झालो. १९९३ साली बॉम्ब स्कॉड विभागात होतो. तत्कालीन उप विभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र साठे यांचे मार्गदर्शन लाभल्यानेच नांदेड आणि ठाण्याच्या नवीन युनिट बांधणीत महत्त्वाचा वाटा उचलता आला.
शिक्षक दिन : आयुष्यातील आव्हाने पेलण्याचे धडे शिक्षकांकडूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 12:28 AM