वाडा : तालुक्यातील उज्जैनी आखाडा हा दुर्गम व डोंगर द-यांचा भाग असूनही येथील शाळा अवघड क्षेत्रातून वगळल्याने बदलीच्या बाबतीत शिक्षकांमध्ये नाराजी आहे. महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास विभागामार्फत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यासाठी अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र असे भाग ठरवून बदल्या करण्याचे धोरण निश्चित केले आहे. अवघड क्षेत्राची व्याख्या तालुका मुख्यालयापासून दूर, डोंगराळ व दुर्गम भाग, वाहतुकीस अवघड भाग असा उल्लेख असतांना आणि स्थानिक केंद्र प्रमुखांनी या केंद्रातील उज्जैनी शाळेसह आढावा घेऊन यादी दिली असतांनाही, तालुकास्तरावर उज्जैनी शाळा अवघड क्षेत्रातून वगळल्याने शिक्षकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. शिक्षकांनी सांगितले की, दहा वीस वर्षे आम्ही येथेच काम करायचे काय, आम्ही स्वेच्छेने दुर्गम भागातील शाळा घेतल्या हा आमचा गुन्हा झाला काय? असा निराशाजनक प्रश्न करून शिक्षकांनी सांगितले की उज्जैनी भागात पावसात वाहने अथवा एस.टी.बंद असते. दरडी कोसळण्याचा धोका असतो. नदी नाल्यांच्या पुरामुळे रस्ता पाण्याखाली जातो. तरीही ही शाळा अवघड क्षेत्रात नाही, असे कसे म्हणता येईल (वार्ताहर)
अवघड क्षेत्रातून उज्जैनी शाळा वगळल्याने शिक्षकात नाराजी
By admin | Published: April 25, 2017 11:59 PM