शशिकांत ठाकूर
कासा : देशासह राज्यात व जिल्ह्यात कोरोना संसर्ग पुन्हा वाढत असून, साथीरोग नियंत्रणात अनेक वेळा शिक्षकांनी वेगवेगळ्या प्रकारची कामे केली आहेत. त्यामुळे शिक्षकांना कोरोना लागण होऊन मृत्यू झाला आहे. मात्र, कोरोना नियंत्रण मोहिमेत शिक्षकांना विमा कवचच नाही. त्यामुळे अशा मृत्यू पावलेल्या शिक्षक कुटुंबीयांना हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आली आहे.
पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये डहाणू तालुका तालुका ४६०, जव्हार तालुका २२८, पालघर तालुका ४०७, मोखाडा तालुका १५५, तलासरी तालुका १५५, विक्रमगड तालुका २३६, वसई तालुका १९४ व वाडा तालुका २९६ अशा एकूण २१३१ शाळा आहेत, तर शिक्षक डहाणू १३६८, जव्हार ५५६, पालघर ९९५, मोखाडा ३९२, तलासरी ५५८, विक्रमगड ६६७, वसई ७८०, वाडा ७४६ असे एकूण ६०२२ शिक्षक कार्यरत आहेत. दरम्यान, मागील लाॅकडाऊन काळात काही शिक्षकांना कोरोना सेंटर, गावागावात आरोग्य सर्वेक्षणाची कामे लावण्यात आली होती, तसेच ज्या ठिकाणी हॉटस्पॉट आहेत, अशा ठिकाणी आशासेविकांबरोबर जाऊन घरोघरी ताप, खोकला, सर्दी आदी रुग्ण असल्याचे सर्व्हे करणे, तापमान मोजणे आदी कामे लावली होती. तर १ एप्रिल ते १५ एप्रिलमध्ये डहाणू २, वसई-विरार ३, वाडा १ जव्हार १ असे एकूण सात शिक्षकांचा मृत्यू झाला होता, तर त्यानंतर सहा ते सात अशा एकूण सुमारे चौदा शिक्षकांचा मृत्यू मागील महिनाभरात झाला आहे.
शिक्षकांना घरोघरी जाऊन करावी लागतात कामेकर्तव्य बजावताना, काही शिक्षकांना कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला होता, तर शाळा सुरू झाल्यावर कोरोना काळात १ मार्च ते १० मार्चदरम्यान घरोघरी जाऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण काम शिक्षकांना लावण्यात आले होते. यामध्ये गजबजलेल्या वस्त्या, रेल्वे स्थानके, वीटभट्टी, दगडखाणी, मोठी बांधकामे, स्थलांतरित कुटुंबे, झोपड्या, चाळी येथून शाळाबाह्य मुलांना शोधण्याचे काम शिक्षकांना दिले होते. यात प्रत्यक्षात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावे लागत असल्याने, सुमारे ५० शिक्षकांना कोरोनाची लागण झाली होती.