वाडा : शिक्षण विभागातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबाबत महाराष्ट्र सरकारने शैक्षणिक, प्रशासकीय आणि आर्थिक बाबतीत राबवलेल्या विविध अन्यायकारक धोरणांचा निषेध करण्यासाठी पालघर जिल्हा शिक्षकसेनेच्या वतीने रविवारी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना घेराव घालण्यात येणार आहे. तसेच सोमवारी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत महाराष्ट्र सरकारने तयार केलेल्या मसुद्याला शिक्षणक्षेत्र आणि समाजातून प्रचंड विरोध झाल्याने हा मसुदा सरकारला सपशेल मागे घ्यावा लागला. या मसुद्यातील आठ तासांची शाळा, शैक्षणिक आरक्षण रद्द करण्याचा प्रस्ताव, अतिथी शिक्षक नेमणे अशा प्रस्तावांना शिक्षकांचा तीव्र विरोध आहे. तसेच २८ आॅगस्ट २०१५ च्या संचमान्यतेच्या वादग्रस्त शासन निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. तसेच कला व क्रीडा शिक्षकांच्या नोकऱ्यांवर गदा आणणाऱ्या ७ आॅक्टोबर २०१५ च्या शासन निर्णयाला शिक्षकसेनेने कडाडून विरोध केला आहे.१ नोव्हेंबर २०१५ नंतरच्या शिक्षकांनासुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करावी. पालघर जिल्ह्यातील शिक्षण विभागातील मुख्याध्यापक, पदवीधर आणि शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, शिक्षकांचे वेतन दरमहा १ तारखेला अदा करावे, यासारख्या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांच्या आदेशान्वये पालघर जिल्हा शिक्षकसेनेतर्फे रविवारी जिल्हाभरात पालकमंत्री, खासदार, आमदार, जि.प. आणि पं.स. पदाधिकारी यांना घेराव घालणार असून सोमवारी दु. ३ ते ५ या वेळेत पालघर जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्राच्या खाजगीकरणाच्या दिशेने शासनाची वाटचाल सुरू असून हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी या आंदोलनात जिल्ह्यातील बहुसंख्य शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालघर जिल्हा शिक्षकसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पाटील, कार्याध्यक्ष मनिष पाटील, सरचिटणीस अविनाश सोनावणे, कोषाध्यक्ष जितेंद्र वडे, चिटणीस आत्माराम हर, सचिव सुधीर खिलारे यांनी केले आहे. (वार्ताहर)
शिक्षक सेनेचा रविवारी लोकप्रतिनिधींंना घेराव
By admin | Published: November 28, 2015 1:02 AM