मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील भाईंदर भरोसेलच्या प्रभारी सहायक निरीक्षक तेजश्री शिंदे यांना बालकांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्या बद्दल राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आणि महिला व बालविकास आयुक्तालय, युनिसेफ यांच्या वतीने पहिला बाल स्नेही पुरस्कार २०२३ प्रदान करण्यात आला आहे.
राज्यात बालकांच्या सर्वांगीण विकास, बाल विकास हक्क संरक्षण, सुरक्षा व आरोग्य इत्यादी बाबतीत विविध प्रशासकीय विभागा सह बालगृह, बालकल्याण समिती आदी कार्य करत असतात. बालकांसाठी सकारात्मक पध्दतीने मोलाचे कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना "बालस्नेही ” पुरस्काराने सन्मानित करण्याचा कार्यक्रम मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आणि महिला व बालविकास आयुक्तालय, युनिसेफ यांनी मंगळावर २२ नोव्हेम्बर रोजी आयोजित केला होता.
पुरस्काराचे यंदाचे पहिलेच वर्ष असून मीरा भाईंदर मधील पोलिसांच्या भरोसा सेलच्या प्रभारी असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे यांची ह्या पहिल्याच बालस्नेही पुरस्कारासाठी निवड झाली. राज्य बाल व हक्क संरक्षण आयोगच्या अध्यक्षा अॅड. सुशीबेन शाह, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभागचे विशेष पोलीस महानिरीक्षक दिपक पांडेय यांच्या हस्ते तेजश्री शिंदे सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
तेजश्री शिंदे ह्या बालकांचे होणारे लैंगिक शोषण व इतर गुन्हयाबाबत बालकामध्ये जनजागृती करण्यासाठी "कायदयाचे धडे” हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांकरिता तसेच नागरिकां करीता राबवत आल्या आहेत. आता पर्यंत असे ७५ कार्यक्रम त्यांनी घेतले असून सुमारे ४० शाळा व २५ हजार विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी लैंगिक शोषण, कायदा बाबत जनजागृती केली आहे. भरोसा सेलच्या १ ऑक्टोंबर २०२३ रोजीच्या दुसऱ्या वर्धापन दिनी शिंदे यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी प्रसंशापत्रक देवून गौरव केला होता.