वसंत भोईर / वाडातालुक्यातील गुंज येथील परशुरामांच्या प्राचीन मंदिराची पडझड झाली असून पुरातत्वखात्याने त्याची डागडुजी करावी व हा ऐतिहासिक ठेवा जपावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. हे मंदीर सुमारे ६०० ते ७०० वर्षांपूर्वीचे असून त्याची आता पडझड होत चालली आहे. एक एक चिरा निखळत चालला आहे. त्याची वेळीच दुरुस्ती न झाल्यास ते जमीनदोस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबतची मागणी अखिल भारतीय परशुराम सेनेचे अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा यांनी केली आहे. गुंज गावात श्री परशुरामांचे मंदिर एका टेकडीवर असल्यामुळे लांबूनच आपले लक्ष वेधून घेते. परशुरामांना भार्गवराम या नावाने सुद्धा ओळखले जाते. गावाच्या टोकाला असलेल्या तलावाजवळून जाणारी पायवाट आपल्याला या मंदिरात घेऊन जाते. हे मंदिर उत्तराभमुखी असून संपूर्ण जांभ्या दगडात बांधलेले आहे. ते गर्भगृह आणि गाभारा असे दोन भागात विभागले आहे. गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी तीन दिशांना दरवाजे आहेत. मंदिराचा गाभारा छोटा असून भार्गवरामांची दोन फूट उंचीची मूर्ती चौथऱ्यावर दगडी महिरपीत आहे. तिच्या गळ्यात फुलांचा हार कोरलेला असून भार्गवरामांनी पिवळे पितांबर नेसलेले आहे. मंदिरावर झाडे झुडपे वाढल्याने त्यांचा पासून मंदिराला धोका उत्पन्न झाला आहे. पुरातत्व विभागाने या मंदिराकडे लक्ष देऊन त्याची दुरु स्ती करून ऐतिहासिक व पौराणकि ठेवा जतन करावा अशी मागणी ओमप्रकाश शर्मा यांच्यासह गुंज गावातील नागरिकांनी केली आहे.
गुंज येथील श्री परशुरामांच्या मंदिराची झाली पडझड !
By admin | Published: April 26, 2017 11:30 PM