बोईसर : पर्यावरणाच्या निकषांचे गेली अनेक वर्षे उल्लंघन करणाऱ्या तारापूरमधील उद्योगांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर (सीईटीपी) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदची कारवाई करताच उद्योगमंत्री व एमपीसीबीचे सदस्य सचिव यांच्याकडे सोमवारी अत्यंत वेगाने झालेल्या बैठकीत उद्योजकांना तात्पुरते झुकते माप दिले गेले आहे. यात काही अटी व शर्तीसह नवीन सीईटीपी २० मार्चपर्यंत सुरू करण्यासंदर्भात मुदतवाढ देऊन सीईटीपीवर केलेल्या कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सामुदायिक सांडपाणी प्रक्रि या केंद्र बंद करण्याचा आदेश ६ मार्च रोजी बजावला होता. या आदेशानंतर हे केंद्र बंद झाले असते तर तारापूर येथील सुमारे ६०० उद्योगांना फटका बसला असता. तसेच लाखो कामगारांवर बेरोजगाराची वेळ येऊ शकली असती. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी (दि.९) मंत्रालयात तातडीच्या बोलविलेल्या बैठकीला उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पी. अनबलगन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई. रवींद्रन तसेच तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (टीमा) आणि तारापूर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन सोसायटी (टीईपीएस)चे प्रतिनिधी अशोक सराफ, प्रशांत अगरवाल, पवन पोद्दार, डी.के. राऊत, राम पेठे आदी उपस्थित होते. देसाई यांनी नवीन सामुदायिक सांडपाणी प्रक्रि या केंद्र येत्या २० मार्च २०२० पर्यंत सुरू करण्याचे निर्देश संबंधितांना दिल्यानंतर प्रतिदिन ५० दशलक्ष लिटर क्षमतेपैकी २५ दशलक्ष लिटर नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यान्वित करण्याचे उद्योजकांनीही या वेळी मान्य केले, तर उद्योजकांनी विहित मुदतीत सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्यास हयगय केल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देशही उद्योग मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना या वेळी दिले. नवीन ५० एमएलडी क्षमतेचा सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर जुन्या सांडपाणी प्रक्रि या केंद्रावरचा भार कमी होईल. तसेच जुने प्रक्रि या केंद्र ओसंडून वाहण्याची प्रक्रिया थांबेल, असा आशावाद देसाई यांनी बैठकीत व्यक्त केला आहे.टांगती तलवार कायमतारापूर येथील प्रति दिन २५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रि या केंद्रांमध्ये आवश्यक दर्जा राखला जात नाही. यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांचे उल्लंघन होत असल्याने सांडपाणी प्रक्रि या केंद्र बंद करण्याचे दिलेले आदेश सरसकट मागे घेतले गेले नसले तरी काही दिवसासाठी शिथिल करण्याबाबत संकेत मिळाले असून सीईटीपीवरील बंदच्या कारवाईची टांगती तलवार कायम आहे.