भातसानगर : हिवाळ्यात न साधलेली भाजीपाला पिके उशिरा का होईना मात्र ती सेंद्रिय पद्धतीने घेण्याचा कल शहापूर तालुक्यात वाढत असल्याने भविष्यात सर्वत्र हेच चित्र पाहावयास मिळणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. तालुक्यात हिवाळ्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिके घेण्यावर भर असतो. आज तालुक्यात भाजीपाला पिके घेण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून गावागावांतील शेतकरी शेतीकडे ओढले जात असल्याचे चित्र शहापूर तालुक्यात तरी दिसत आहे. कालवे, नदी, नाले, ओढे यांच्यातील पाण्याचा उपयोग भाजीपाला पिकासाठी केला जात आहे.
जवळजवळ ७०० हेक्टरवर हे उत्पादन घेतले जाते. यामध्ये बहुतांश शेतकरी हे रासायनिक खतांच्या वापराऐवजी आता सेंद्रिय खतांचा वापर करूनच उत्पादन घेण्यावर भर देत आहेत. आज आधुनिक पद्धतीने एसआरटी पद्धतीला जोड ठिबक सिंचनपद्धतीचा अवलंब करून काकडी, भेंडी, कारली, वांगी, मिरची, पपई, झेंडू, टोमॅटो, घोसाळी यासारखी उत्पादने घेतली जात आहेत.रासायनिक खतांच्या अमर्याद वापरामुळे उत्पादन वाढले, मात्र त्यामुळे अनेक आजार निर्माण तर झालेच, पण जमिनीचा पोत कमी होऊन ती नापीक बनत असल्याने शेतकरी आता सेंद्रिय पिकाकडे वळला असल्याचे दिसत आहे. या सेंद्रिय पिकांमुळे जमिनीचा पोत वाढतो, जमीन सुपीक बनते, भाजीपाल्याला भावही मिळतो, अधिक उत्पादनही घेता येते.चांगला भाजीपाला विकल्याचे मनाला समाधानही मिळत असल्याचे भास्कर पांडुरंग पाटील, डॉ. प्रकाश काठोले, जगन पाटील या शेतकऱ्यांनी सांगितले.आज तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सेंद्रियपद्धतीचा अवलंब करून उत्पादन घेत असल्याची आनंदाची बाब समोर येत आहे.- विलास झुंजारराव, कृषी अधिकारीआज आम्ही सेंद्रिय पद्धतीने जो भाजीपाला पिकवतो, त्याचे आम्हाला निश्चित समाधान आहे.- भास्कर पाटील, शेतकरी