मोखाडा : मोखाडा शहरापासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या व नगर पंचायत क्षेत्रातील टाकपाडा या प्रभाग क्र मांक ६ मध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून मातीमिश्रीत पाणी प्यावे लागत असल्याने स्थानिकांना वेगवेगळ्या आजारास बळी पडावे लागते आहे. यामुळे नगर पंचायत प्रशासन व नगरसेविकेचे या याकडे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याने पाण्यासाठी वणवण भटकंती करणाऱ्या माता - भगीनींकडून नगरसेविकेविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. वर्षानुवर्ष मार्च महिन्यापासून भेडसावणाऱ्या तीव्र पाणी टंचाई च्या समस्येने त्रस्त झालेल्या टाकपाडा वासीयांना मोखाडा ग्रामपंचायत क्षेत्र असतांना सुरवातीची काही वर्षे नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात होता परंतु अलिकडे काही वर्षा पासून ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर झाल्या नंतर हा पाणी पुरवठा कायमचा बंद करण्यात आला. मात्र त्याची पाणीपट्टी मात्र नागरिकांकडून वसूूल केली जाते आहे. यामुळे नगर पंचायत क्षेत्रासाठी नळपाणी पुरवठा असतांना ही पाण्यासाठी वणवण भटकंती करण्यास भाग पाडणाऱ्या नगर पंचायत प्रशासन व निवडणुकीत मतांची भीक मागणाऱ्या व आता निवडून येताच पाठ फिरविणाऱ्या नगरसेवकांविरोधात संताप खदखदतो आहे.
टाकपाड्यात भीषण पाणीटंचाई
By admin | Published: March 31, 2017 5:32 AM