हितेन नाईक -
पालघर : पालघर पूर्वेकडील बांधकाम व्यावसायिक कीर्ती बाफना यांच्या मुलाच्या लग्नासाठी राम बाग पॅलेस, जयपूर, राजस्थान येथे गेलेल्या पालघरमधील १८० वऱ्हाडींपैकी ४ वऱ्हाडी कोरोनाग्रस्त झाले आहेत. यात पालघर नगरपरिषदेच्या नगरसेवकांचा समावेश असून, सर्व १८० वऱ्हाड्यांची कोरोना टेस्ट करून अहवाल सादर करण्याची नोटीस तहसीलदारांनी बाफना यांना नोटीस बजावली आहे. (Testing of 180 people who went to Rajasthan for marriage, four including three corporators affected)
पालघर पूर्व येथे राहणाऱ्या बाफना या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा चिराग बाफना याचे लग्न रामबाग पॅलेस, जयपूर राजस्थान येथे होते. त्यासाठी सर्वजण ८ ते ९ मार्च रोजी तेथे होते. आपल्या मुलाच्या लग्नासाठी पालघरमधील नगरसेवक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, डॉक्टर, कारखानदार, बिल्डर आदी काही प्रतिष्ठित व्यक्तिंची विमानाच्या प्रवासासह हॉटेल्समध्ये दोन दिवसांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सुमारे १८० वऱ्हाडी राजस्थानची टूर करून पालघरला परत आल्यानंतर त्यातील काही वऱ्हाडींना ताप, सर्दी, खोकल्याचा आजार झाल्यानंतर त्यांच्या तपासणीत पालघर नगरपरिषदेच्या तीन नगरसेवकांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.
या लग्न समारंभाचे फोटोग्राफ्स सोशल मीडियावरून प्रसिद्ध झाल्यानंतर याची चर्चा जिल्ह्यात होऊ लागली. त्यामुळे याची गंभीर दखल घेण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे होऊ लागल्यानंतर तहसीलदार सुनील शिंदे यांनी सर्व वऱ्हाडींना कोरोना तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे तहसीलदारांनी १३ मार्च रोजी कीर्ती बाफना यांना कोविड-१९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याबाबत नोटीस बजावून पालघरमधील १८० प्रतिष्ठित व्यक्ती, व्यापारी यांना इंडिगो कंपनीच्या विमानाने जयपूर येथे घेऊन गेल्याने त्यातील तीन जण पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाल्याचे सांगितले.
संपर्कात आलेल्यांना बाधा होण्याची शक्यता- बाधितांच्या संपर्कात आलेल्या अनेक लोकांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता पाहता १४ ते १५ मार्च रोजी सर्वांना आरटीपीसीआर किंवा कोरोना रॅट तपासणी करण्यास घेऊन जाण्याबाबत प्रशासनाकडून बाफना यांना कळविण्यात आले आहे.
- सदरची कार्यवाही करून कार्यालयास लेखी स्वरूपात अवगत करावे अन्यथा पालघर शहर व परिसरात कोरोनाचा प्रसार करण्यास आपणास कारणीभूत धरून आपल्याविरोधात कारवाई करण्यात येईल, असेही नोटीसमध्ये बजावले आहे.