पालघर : तालुक्यातील केळवे रोड आणि माहीम गावातील शासकीय विभागाच्या दुग्धव्यवसाय विभागाकडील सुमारे १,२०० एकर जमिनीवर टेक्स्टाइल पार्क उभारण्याबाबत हालचालींना सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाकडून भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू झाल्याचे समजते. हे टेक्स्टाइल पार्क रिलायन्स समूह उभारणार असल्याची चर्चा आहे. वीज, पाणी, रस्ते आदी सोयी-सुविधांच्या अनुषंगाने हालचाली सुरू झाल्या आहेत.
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
केळवे रोड येथील टोकराळेमधील सर्व्हे नंबर ६, ८, १०, ११, १२अ, १३, १४, ३१, ३३, ३४ मधील ११२ हेक्टर जमीन तसेच माहीम गावातील सर्व्हे नंबर ८३५/१ मधील ६३ हेक्टर जमीन व ८३६ सर्व्हे नंबरमधील १११ हेक्टर जमिनीवर टेक्स्टाइल पार्क उभारणीचे प्रयत्न सुरू झाले.
मात्र, यासंदर्भात पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी दुजोरा दिलेला नाही. या पार्कबाबत कोणताही प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे आला नसल्याचे ते सांगत आहेत. मात्र राज्याच्या एमआयडीसी विभागाकडून आलेल्या अधिकाऱ्यांसह काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी, पाटबंधारे विभाग, वनविभाग, महावितरण विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्याची बाब समोर आली आहे.
सबस्टेशन प्रस्तावित करण्याची मागणी
केळवे पूर्व भागात विमानतळ निर्माण करण्याबाबत काही वर्षांपूर्वी राज्य शासनाकडून हालचाली झाल्या होत्या. मात्र, त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झाले नाही. अलीकडेच वाढवण बंदराच्या भूमिपूजनप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघरमध्ये विमानतळ निर्मितीबाबत सूतोवाच केल्याने भविष्यात विकासात्मक घडामोडी घडू शकतात. केळवे पूर्व भागात टेक्स्टाइल पार्कबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत महावितरणकडून टोकराळे येथे २५० मेगावॉटचे २२० x ३३ केव्हीचे सबस्टेशन प्रस्तावित करण्याची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.